निकाल घटिका समीप, उत्सुकता शिगेला -: राजकीय चर्चांनी पुन्हा जिल्ह्याचे वातावरण तापले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 23:25 IST2019-05-21T23:23:45+5:302019-05-21T23:25:42+5:30
सांगली लोकसभा मतदार संघाच्या निकालासाठी आता केवळ एकच दिवस उरल्याने, उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मतमोजणीची शासकीय तयारी पूर्ण झाली असून, बुधवारी रंगीत तालीम घेतली जाणार आहे.

निकाल घटिका समीप, उत्सुकता शिगेला -: राजकीय चर्चांनी पुन्हा जिल्ह्याचे वातावरण तापले
सांगली : सांगली लोकसभा मतदार संघाच्या निकालासाठी आता केवळ एकच दिवस उरल्याने, उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मतमोजणीची शासकीय तयारी पूर्ण झाली असून, बुधवारी रंगीत तालीम घेतली जाणार आहे. गतवेळच्या प्रक्रियेपेक्षा यंदा थोडे बदल झाले असल्याने, निकाल उशिरा लागण्याची चिन्हे आहेत.
लोकसभेच्या सांगली मतदार संघासाठी उद्या (गुरुवार) मतमोजणी होत असून, यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. सकाळी ८ वाजल्यापासून एकूण १८ फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार असून, दुपारी चार वाजेपर्यंत निकाल अपेक्षित आहे. मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्यासाठी ५९२ कर्मचारी व अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. ईव्हीएम मतमोजणीसाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय २0 टेबलांची मांडणी करण्यात आली आहे.
सहा विधानसभा मतदारसंघ असल्याने एकूण १२0 टेबले याठिकाणी मांडण्यात आली आहेत. त्याशिवाय एक टपाली मतमोजणी, तसेच सैनिक मतमोजणी विभाग असे एकूण आठ विभाग आहेत. त्यांच्या टेबलांचा विचार केल्यास, एकूण १४0 टेबले या मतमोजणी केंद्रात असणार आहेत.
सकाळी ८ वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरूवात होणार आहे. मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सकाळी ६ वाजता नियुक्त केलेल्या ठिकाणी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सकाळी सात वाजता ईव्हीएम ठेवलेल्या गोदामाचे सील उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत उघडण्यात येणार आहे. टपाली मतमोजणी ८ वाजता सुरू होईल. त्यानंतर ईव्हीएमची मतमोजणी सुरू केली जाईल.
तसेच, ईव्हीएमची मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय निवडलेल्या (रँडमली सिलेक्टेड) पाच व्हीव्हीपॅटची मतमोजणी होणार आहे. मतमोजणीच्या एकूण २४ फेºया होणार आहेत. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पहिल्या फेरीचा निकाल जाहीर होण्याची अपेक्षा आहे. दुपारी चार वाजेपर्यंत मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे.
याठिकाणी होणार : मतमोजणी
मिरज सेंट्रल वेअर हाऊसमध्ये मतमोजणीचे फेरीनिहाय निकाल जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी जाहीर करणार आहेत. मतमोजणीच्या ठिकाणी यासाठी ध्वनिक्षेपक यंत्रणा बसवण्यात आली आहे. मतमोजणीच्या बाहेरील बाजूस असणाºया नागरिकांना हा निकाल ऐकता येणार आहे. तसेच संपूर्ण प्रक्रियेचे चित्रीकरण होेणार आहे.
उन्हामुळे दक्षतेचे उपाय...
सध्या तीव्र उन्हाळा असल्यामुळे पंखे, कुलर यांची व्यवस्था केली आहे. वीज पुरवठा खंडित होणार नाही, याची दक्षता घेण्याबाबत महावितरणला सूचना दिली आहे. वीज पुरवठा खंडित झाल्यास, जनित्राची व्यवस्था केली आहे. मतमोजणी कक्षातील सर्व संगणक लॅन पद्धतीद्वारे जोडले आहेत. इंटरनेट सुविधा अखंडपणे कार्यरत राहील, यासाठी उपाय केले आहेत.
मोबाईल बंदी : मतमोजणी केंद्रात प्रमुख अधिकारी वगळता इतर सर्व अधिकारी व कर्मचारी, तसेच मतमोजणीसाठी नियुक्त इतर कर्मचारी वर्गाला मतमोजणी केंद्रात मोबाईल आणता येणार नाही. मोबाईल आणल्यास तो जप्त करण्यात येणार आहे. मतमोजणीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचारी, प्रतिनिधी, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी यांना देण्यात आलेल्या ओळखपत्राशिवाय केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही.
मिरवणुकांवर ‘वॉच’ : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी निकालानंतर मिरवणुकांवर बंदी घालण्यात आली आहे. दुचाकीचे सायलेन्सर काढून दुचाकी फिरवून ध्वनिप्रदूषण करणाºयांवर प्रशासनाचा वॉच असेल. संबंधितांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश पोलीसप्रमुखांनी दिले आहेत.
मनाई आदेश लागू : मतमोजणीची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी, जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहावी, याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार सांगली जिल्ह्यातील सेन्ट्रल वेअर हौसिंग कॉर्पोरेशन, मिरज इमारतीपासून दोनशे मीटर सभोवतालच्या परिसरात मनाई आदेश जारी केला आहे.
विधानसभा मतदार संघनिहाय फेऱ्या
मतदारसंघ केंद्र फेºया
मिरज ३२६ १७
सांगली ३१० १६
पलूस-कडेगाव २८४ १५
खानापूर ३४८ १८
तासगाव-क.म. २९७ १५
जत २८३ १५
विधानसभानिहाय झालेले मतदान
मतदारसंघ एकूण टक्के
मिरज २0९0१८ ६४.४८
सांगली २0२१५८ ६३.0२
पलूस-कडेगाव १८६४0४ ६७.७२
खानापूर २0७0६१ ६४.४८
तासगाव-क.महां. २0४0५७ ६९.८५
जत १७0११६ ६३.१0
एकूण ११७८८१४ ६५.३८