एप्रिलमध्ये राष्ट्रवादीला पडणार मोठे खिंडार गटबाजीचा परिणाम : १८ नगरसेवकांसह २३ जण सोडणार पक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 01:09 IST2018-03-29T01:09:23+5:302018-03-29T01:09:23+5:30
सांगली : राष्ट्रवादीतील गटबाजी टोकाला गेली असून एप्रिलमधील पक्षाच्या हल्लाबोल आंदोलनानंतर महापालिकेच्या १८ नगरसेवकांसह २३ जण पक्षाला रामराम करणार असल्याची माहिती खात्रीशीर सूत्रांकडून

एप्रिलमध्ये राष्ट्रवादीला पडणार मोठे खिंडार गटबाजीचा परिणाम : १८ नगरसेवकांसह २३ जण सोडणार पक्ष
सांगली : राष्ट्रवादीतील गटबाजी टोकाला गेली असून एप्रिलमधील पक्षाच्या हल्लाबोल आंदोलनानंतर महापालिकेच्या १८ नगरसेवकांसह २३ जण पक्षाला रामराम करणार असल्याची माहिती खात्रीशीर सूत्रांकडून मिळाली. त्यामुळे राष्टÑवादीला
मोठे खिंडार पडण्याची चिन्हे दिसत आहेत. दरम्यान, नाराजांवर भाजपच्या नेत्यांनी गळ टाकला आहे.
सांगली शहर जिल्हाध्यक्षपदी संजय बजाज यांची फेरनिवड करण्यावरून पक्षांतर्गत वाद निर्माण झाले आहेत. विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष कमलाकर पाटील यांच्यासह १९ नगरसेवक आणि १४ पदाधिकारी अशा एकूण ३३ जणांचे बजाज यांच्या निवडीस विरोधाचे पत्र प्रदेशाध्यक्षांकडे पाठविण्यात आले आहे.
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अद्याप याविषयी कोणताही निर्णय घेतलेला नाही. तरीही त्यांनी जयंत पाटील यांच्याशी याबाबत चर्चा केल्याचे समजते. पंधरा दिवसात या गटाला निर्णय अपेक्षित होता. तसा कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने या गटाने सांगलीत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी हल्लाबोल आंदोलनापर्यंत संयम बाळगून पक्षाच्या निर्णयाची प्रतीक्षा करण्याचा निर्णय घेतला.
सांगली जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात येत्या ४ व ५ एप्रिल रोजी शासनाच्या विविध धोरणांचा विरोध म्हणून हल्लाबोल आंदोलन होणार आहे. महापालिका क्षेत्रातही हे आंदोलन होणार आहे. याची जबाबदारी दोन्ही गटातील पदाधिकाऱ्यांवर आ. जयंत पाटील यांनी सोपविली आहे. त्यामुळे घेतलेली जबाबदारी पूर्ण करायची आणि नंतर पक्षाला रामराम करायचा, असा निर्णय पक्षातील कमलाकर पाटील गटाच्या २३ जणांनी घेतला आहे. कोणत्या पक्षात जायचे, याचा निर्णय अद्याप झालेला नाही. त्याबाबतचा फैसला नंतर करण्याचे त्यांनी निश्चित केले आहे. दरम्यान, भाजपच्या नेत्यांनी हे सर्व नगरसेवक आपल्या गळाला लागावेत म्हणून जोरदार फिल्डिंग लावली आहे.
पक्षांतर्गत गटबाजीवर कोणताही तोडगा निघालेला नाही. संजय बजाज आणि कमलाकर पाटील यांच्यातील वादात दोन गट पडले आहेत. कमलाकर पाटील यांच्या गटात बहुतांश नगरसेवक आहेत.बजाज यांच्याकडे काही नगरसेवक आहेत. त्यामुळे पक्ष गटबाजीवर काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पक्षाने सावध भूमिका घेत निर्णय लांबणीवर टाकला. याच गोष्टीबद्दल पक्षाच्या अनेक नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली आहे. एप्रिलच्या पहिल्या किंवा दुसºया आठवड्यात ते एकत्रितपणे पक्ष सोडण्याची घोषणा करू शकतात. त्यांनी पक्ष सोडला तर पक्षाला मोठे खिंडार पडणार आहे.
भाजपचा डोळा : दोन्हीकडून गोपनीयता
भाजपच्या काही नेत्यांनी राष्टÑवादीच्या विद्यमान आठ नगरसेवकांशी गेल्या आठवड्यात पक्षप्रवेशाबाबत चर्चा केली आहे. यातील काहींनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे समजते. अधिकृत निर्णय होईपर्यंत भाजपच्या नेत्यांनी कुठेही याविषयी चर्चा करू नये, असे राष्टÑवादीच्या या नगरसेवकांनी सुचविल्याचेही समजते. त्यामुळे दोन्हीकडून गोपनीयता बाळगण्यात आली असल्याचे दिसत आहे.