जिल्ह्यात १२ जुलैपर्यंत निर्बंध कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:19 IST2021-07-04T04:19:23+5:302021-07-04T04:19:23+5:30
सांगली : जिल्ह्यातील कोरोनास्थिती या आठवड्यातही कायम राहिल्याने प्रशासनाने लागू केलेले निर्बंध पुढील आठवड्यातही कायम राहणार आहेत. या आठवड्यात ...

जिल्ह्यात १२ जुलैपर्यंत निर्बंध कायम
सांगली : जिल्ह्यातील कोरोनास्थिती या आठवड्यातही कायम राहिल्याने प्रशासनाने लागू केलेले निर्बंध पुढील आठवड्यातही कायम राहणार आहेत. या आठवड्यात पॉझिटिव्हिटी रेट दहा टक्क्यांपेक्षा जादा असल्याने अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने व सेवा १२ जुलैपर्यंत बंद राहणार आहेत. जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी याबाबतचे आदेश शनिवारी दिले.
राज्य शासनाच्या निर्देशानुसार आठवड्यातील आरटीपीसीआर चाचण्या व रुग्णांच्या प्रमाणावरून पॉझिटिव्हिटी रेट ठरविण्यात येणार आहे. जिल्ह्यात या आठवड्यात सरासरी नऊशेवर रुग्णांची नोंद झाली. दहा टक्क्यांपेक्षा अधिक पॉझिटिव्हिटी रेटमुळे चौथ्या स्तरातील जिल्ह्याचा समावेश कायम राहिला आहे.
निर्बंध कायम राहिल्याने सोमवारपासून किराणा, भाजीपाला, दूध, औषधे, फळेविक्री वगळता इतर सर्व दुकाने बंद राहणार आहेत. हॉटेल्स, रेस्टॉरंटला केवळ पार्सल सेवा देता येणार आहे.
चौकट
आरटीपीसीआर चाचण्यांच्या आधारे पॉझिटिव्हिटी रेट
राज्य शासनाने गेल्या महिन्यात कोरोनाविषयक निर्बंध लागू करताना जिल्हा प्रशासनावर जबाबदारी निश्चित केली आहे. त्यात पुन्हा बदल करताना गेल्या आठवड्यात केवळ आरटीपीसीआर चाचण्यांच्या आधारे पॉझिटिव्हिटी रेट काढण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्ह्यातील रुग्णसंख्या जादा असल्याने प्रशासनाने चाचण्यांचे प्रमाण वाढविले आहे. त्यामुळे या आठवड्यात पुन्हा एकदा दहा टक्क्यांपेक्षा अधिक पाॅझिटिव्हिटी रेटची नोंद झाली.