जतमध्ये विलासराव जगतापांना पुन्हा धक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2015 00:34 IST2015-08-11T00:34:33+5:302015-08-11T00:34:33+5:30
काँग्रेसचे वर्चस्व कायम : विक्रम सावंत, सुरेश शिंदे समर्थकांचा पराभव

जतमध्ये विलासराव जगतापांना पुन्हा धक्का
जत : सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती पंचवार्षिक निवडणुकीत वसंतदादा रयत पॅनेलचे सातपैकी पाच उमेदवार विजयी झाले आहेत. या निकालाने पुन्हा एकदा भाजपचे आमदार विलासराव जगताप यांना धक्का बसला. विजयी उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी जत शहरातील प्रमुख चौकात फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करून आनंदोत्सव साजरा केला.
रयत पॅनेलमधील सोसायटी गटातील उमेदवार मच्छिंद्र वाघमोडे व रवींद्र सावंत यांना अनपेक्षितपणे पराभवाला सामोरे जावे लागले. वाघमोडे यांच्या उमेदवारीसाठी बाजार समितीचे माजी सभापती सुरेश शिंदे यांनी जोरदार प्रयत्न केले होते. रवींद्र सावंत हे जिल्हा मध्यवर्ती बॅँकेचे संचालक विक्रम सावंत यांचे समर्थक आहेत. वाघमोडे यांच्या पराभवामुळे सुरेश शिंदे यांना, तर रवींद्र सावंत यांच्या पराभवामुळे विक्रम सावंत यांना धक्का बसला आहे. बाजार समिती निवडणुकीत शेतकरी विकास पॅनेलचे सहा उमेदवार होते. या सहापैकी एकही उमेदवार विजयी झाला नाही. त्यामुळे आ. विलासराव जगताप यांच्या राजकारणाला हा एक धक्काच मानला जात आहे. रयत पॅनेलमधील सर्वच सात उमेदवारांना जत तालुक्यातून मताधिक्य मिळाले आहे, तर शेतकरी विकास पॅनेलच्या उमेदवारांना मताधिक्य मिळविता आले नाही. त्यामुळे तालुक्यातील भाजप कार्यकर्ते आणि नेतेमंडळींवर आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे.
सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅँक निवडणूक, जत नगरपालिका नगराध्यक्ष पदाची निवडणूक, तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका व आता झालेली बाजार समितीची निवडणूक, या सर्व ठिकाणी आ. विलासराव जगताप यांना पराभवास सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे यापुढील काळात तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहेत. माजी समाजकल्याण समिती सभापती आकाराम मासाळ यांची मदत घेऊन सुरेश शिंदे व विक्रम सावंत यांनी बाजार समितीची सत्ता हस्तगत केली आहे. बाजार समितीच्या निवडणूक निकालावरून तालुक्यातील कॉँग्रेस एकसंध आहे, हे स्पष्ट झाले आहे. (वार्ताहर)
‘जनसुराज्य’ची बाजी
जत तालुक्यात जनसुराज्य शक्ती पक्षाचे अस्तित्व संपले आहे, असा आरोप आमदार विलासराव जगताप व बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश जमदाडे यांनी निवडणूक प्रचारादरम्यान केला होता. परंतु रयत पॅनेलमधील जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार देवगोंडा बिराजदार (पाटील) हे विजयी झाले आहेत. त्यामुळे माजी जि. प. उपाध्यक्ष बसवराज पाटील यांनी पक्षाचे अस्तित्व असल्याचे दाखवून दिले आहे.