- संतोष भिसेसांगली : तामिळनाडूतील पर्वतरांगांमध्ये पालींच्या दोन नव्या प्रजातींचा शोध संशोधकांनी लावला. संशोधकांचे पथक गेल्या अनेक महिन्यांपासून तामिळनाडूतील पर्वतरांगा पालथ्या घालत आहे. हेमीफायलोडॅक्टीलस (स्लेंडर गेको) या कुळातील पाली फक्त पश्चिम भारतात म्हणजेच कर्नाटक, तामिळनाडू, केरळ व आंध्र प्रदेशातील पूर्व घाटात आढळतात.
या कुळातील पालींच्या चार प्रजातींची नोंद आजवर झाली आहे, पैकी तीन प्रजातींचा शोध याच पथकाने गेल्यावर्षी लावला होता. पूर्ण अभ्यास व संशोधनाअंती त्याचे निष्कर्ष व शोधप्रबंध ‘झुटाक्सा’ या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रकाशित झाला. या संशोधनामुळे भारतातील या कुळातील पालींच्या प्रजातींची संख्या सहा झाली आहे.या पाच संशोधकांमध्ये हिवतड (ता. आटपाडी,जि.सांगली) येथील अक्षय खांडेकर, ईशान अगरवाल (ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशन मुंबई ), रौनक पाल (बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी), एरन बावर (विलानोवा युनिव्हर्सिटी पेनसिल्व्हानिया ) व अच्युतन श्रीकांतन् (सेंटर फॉर बायॉलॉजिकल सायन्सेस, बंगलोर) यांचा समावेश आहे.