सुदानमध्ये अडकलेले सांगलीकर अखेर मायदेशी, मुंबई विमानतळावर स्वागत; कुटूंबियांचा सुटकेचा निश्वास
By शरद जाधव | Updated: May 3, 2023 16:33 IST2023-05-03T16:31:40+5:302023-05-03T16:33:20+5:30
सरकारच्या ‘ऑपरेशन कावेरी’ अंतर्गत ३५ नागरिकांची पहिली बॅच भारतीय वायुसेनेच्या विमानाने पोर्ट सुदान ते जेधाह (सौदी अरेबिया) व जेधाह ते मुंबई असा प्रवास करून भारतात परतली.

सुदानमध्ये अडकलेले सांगलीकर अखेर मायदेशी, मुंबई विमानतळावर स्वागत; कुटूंबियांचा सुटकेचा निश्वास
सांगली : आफिक्रा खंडातील सुदान देशामध्ये सुरू असलेल्या गृहयुध्दामुळे अडकलेल्या सांगली जिल्ह्यातील नागरिकांची अखेर सुटका झाली आहे. बुधवारी सकाळी सुदानहून विशेष विमानाने या नागरिकांचे मुंबई विमानतळावर आगमन झाले. यावेळी त्यांचे स्वागत करण्यात आले. जिल्ह्यातील १०० ते १२० हून अधिकजण सुदानमध्ये अडकले होते. आठवडाभराच्या प्रयत्नानंतर हे मायदेशी येत आहेत.
सुदानमध्ये लष्कर व निमलष्करी दलात निर्माण झालेल्या संघर्षातून गृहयुध्द सुरू झाले आहे. युध्द सुरू झाल्यापासून सुदानमध्ये अडकलेल्या नागरिकांना सुखरूपणे भारतात परत आणण्यासाठी केंद्र सरकारने ‘ऑपरेशन कावेरी’ सुरू केले आहे. सांगली जिल्ह्यातील १०० ते १२० जण रबाका शहराजवळ असलेल्या केनाना शुगर फॅक्टरीमध्ये कामास होते. हा परिसर पूर्णपणे सुरक्षित असलातरी युध्द भडकण्याची चिन्हे असल्याने या कारखान्यातील कामगारांनी परत भारतात नेण्याची मागणी केली होती. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने प्रयत्न चालविले होते.
सरकारच्या ‘ऑपरेशन कावेरी’ अंतर्गत ३५ नागरिकांची पहिली बॅच भारतीय वायुसेनेच्या विमानाने पोर्ट सुदान ते जेधाह (सौदी अरेबिया) व जेधाह ते मुंबई असा प्रवास करून भारतात परतली. यात सांगली जिल्ह्यातील सात नागरिकांचा समावेश आहे.