उरले दहा हजार बचत गट

By Admin | Updated: November 17, 2014 23:23 IST2014-11-17T22:19:30+5:302014-11-17T23:23:18+5:30

प्रशासनाच्या तपासणीतील चित्र : २६ हजार ४४२ गट बंद

The remaining ten thousand savings groups | उरले दहा हजार बचत गट

उरले दहा हजार बचत गट

सांगली : शासकीय योजनांचा लाभ लाटण्यासाठी २०११ मध्ये जिल्ह्यात ३६ हजार ५७४ बचत गटांची स्थापना झाली. काही बचत गट तर केवळ नावापुरतेच सुरू झाले होते. त्यांचे प्रत्यक्षात कामकाज होत नसल्यामुळे अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे शासनाने बचत गटांचे फेरसर्वेक्षण केले. यामध्ये जिल्ह्यात सध्या केवळ दहा हजार १३२ बचत गट कार्यरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. २६ हजार ४४२ बचत गटांनी कामकाज बंद केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.
बचत गटांना स्वस्त धान्य दुकान, बचत गटांचा पोषण आहार वाटपासह अनेक कामांची संधी देण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे रेशनिंग धान्य विक्रेत्यांची मोठी कोंडी झाली होती. स्वस्त धान्य दुकाने आणि बचत गटांच्या आहाराची कामे पदरात पाडून घेण्यासाठी बचत गटांची संख्या वाढली. बचत गट चळवळ वाढीकडे शासनाचेही काही प्रमाणात दुर्लक्ष झाल्यामुळे बचत गटांचे कामकाज ठप्प झाले.
बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करण्याची नुसती घोषणाच झाली. पण, कुठेही व्यापारी संकुल उभे राहिले नाही. यामुळे हळूहळू बचत गट बंद झाले. काही बचत गट तर अनुदान लाटण्यासाठीच सुरु झाले होते. याची कल्पना मिळाल्यानंतर बंद पडलेल्या बचत गटांचा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विभागाकडून शोध घेतला.
त्यावेळी जिल्ह्यातील २६ हजार ४४२ बचत गटांकडून कोणतेही व्यवहार अथवा उत्पादन घेतले जात नसल्याची माहिती पुढे आली आहे. सध्या केवळ दहा हजार १३२ बचत गट कार्यरत आहेत. नवीन धोरणानुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि दारिद्र्य रेषेखालील जिल्ह्यात ३१० नवीन बचत गटांची स्थापना करण्यात येणार असल्याचेही जिल्हा विकास यंत्रणेकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)

तीन वर्षांतील बचत गटांचे चित्र

तालुका२०११२०१४
मिरज६९९२२०१९
तासगाव२१९७११३४
खानापूर२४२५४७२
आटपाडी१७९३४३८
जत४००१६७१
क.महांकाळ२४०४९०४
वाळवा७४०७१९७६
शिराळा३४४०७५८
पलूस२३६०९३६
कडेगाव२५५५८२४
एकूण३६५७४१०१३२

अनुदान लाटणाऱ्यांचा शोध
शासकीय अनुदानासाठी काही बचत गटांची स्थापन झाली. शासनाला अशा बचत गटांची माहिती मिळाल्याने जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे.

Web Title: The remaining ten thousand savings groups

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.