शासकीय कार्यालये धार्मिक गुलामीतून मुक्त करा
By Admin | Updated: August 25, 2014 22:53 IST2014-08-25T22:46:21+5:302014-08-25T22:53:46+5:30
देव-देवतांच्या प्रतिमा प्रार्थनास्थळांमध्ये स्थलांतरित कराव्यात,

शासकीय कार्यालये धार्मिक गुलामीतून मुक्त करा
सांगली : शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालयांना धार्मिक गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी तेथील देव-देवतांच्या प्रतिमा प्रार्थनास्थळांमध्ये स्थलांतरित कराव्यात, अशी प्रमुख मागणी सेक्युलर मुव्हमेंट संघटनेने आज जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. या प्रक्रियेसाठी सप्टेंबरअखेर मुदत देण्यात आली असून, एक आॅक्टोबरपासून कायद्याच्या चौकटीत राहून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ज्येष्ठ विचारवंत गौतमीपुत्र कांबळे यांनी यावेळी दिला.
आज सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून मोर्चास प्रारंभ झाला. शहरातील प्रमुख मार्गावरुन मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. तेथे सेक्युलर मुव्हमेंटच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. भारतात सध्या जी बहुमतीय निवडणूक पध्दती प्रचलित आहे, ती लोकशाहीमधील ‘एक मत एक मूल्य’ या तत्त्वाशी विसंगत असल्याचे नमूद करुन निवेदनात म्हटले आहे की, सध्या १५ टक्के मते मिळविणारा उमेदवार निवडून येतो, तर ८५ टक्के मते वाया जातात. यामुळे प्रमाणबध्द निवडणूक पध्दतीचा अवलंब करुन पक्षीय निवडणूक पध्दती अवलंबावी. सर्व प्रार्थनास्थळे पुजारी आणि भिकारीमुक्त करावीत, वेगवेगळ्या प्रार्थनास्थळांकडे जमा झालेली संपत्ती, देखभालीचा खर्च वजा जाता शासनाकडे वर्ग करावी, विपश्यनेला वैज्ञानिक आधार नसल्यामुळे अंधश्रध्दा वाढण्याची शक्यता असल्यामुळे शाळा आणि शासकीय अधिकाऱ्यांसाठी शासनाने आवश्यक केलेले विपश्यनेचे वर्ग रद्द करावेत, महाराष्ट्राबाहेरील अनु. जाती, अनु. जमातीच्या लोकांना महाराष्ट्रात खुल्या प्रवर्गात समाविष्ट करणारा प्रचलित कायदा रद्द करावा, जाती निर्मूलनाचा कायदा करावा आदी मागण्यांचा समावेश निवेदनात करण्यात आला आहे.
याप्रसंगी जयंत भालेराव, भारती ढवळे, राजू कदम, आकाश साबळे, डॉ. अशोक गायकवाड, गौतम सांगले, प्रा. साहेबराव नितनवरे, विष्णू काकडे, ज्ञानेश्वर गायकवाड, प्रमोद सारनाथ, प्रा. सुभाष दगडे, प्रा. सचिन गरुड आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)