भाजपाबरोबर सत्तेत सहभागी झाल्याचा पश्चाताप : राजू शेट्टी
By Admin | Updated: June 1, 2017 16:16 IST2017-06-01T15:55:32+5:302017-06-01T16:16:37+5:30
शेतकऱ्यांवर संप करण्याची वेळ हे सरकारसाठी लाजीरवाणे

भाजपाबरोबर सत्तेत सहभागी झाल्याचा पश्चाताप : राजू शेट्टी
आॅनलाइन लोकमत
जयसिंगपूर/उदगांव, दि. 01 - आजपर्यंतच्या इतिहासात शेतकरी संपावर जाण्याची वेळ आली नव्हती, मात्र भाजपा सरकारच्या काळात शेतकऱ्यांवर ही दुदैवी वेळ यावी ही लाजीरवाणी गोेष्ट आहे. भाजपा सरकारबरोबर सत्तेत सहभागी झाल्याचा पश्चाताप होत आहे, अशा शब्दात स्वाभिमान शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांनी खंत व्यक्त केली.
उदगांव येथे स्वाभिमानी दूधाचे संकलन बंद केल्यानंतर राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा जाहीर करत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, सरकारसोबत सत्तेत सहभागी झाल्याचाच आत्मक्लेश करण्यासाठी २०० किलोमीटर पायी चालत जावून सातबारा कोरा करण्याची मागणी मुंबई येथे हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत केली आहे.
राज्यकर्त्यांनी शेतकरी प्रश्नाबाबत अंर्तमुख होऊन विचार करावा, अन्यथा सध्या खवळलेला शेतकरी कोणती भूमिका घेईल हे सांगता येणार नाही. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाण्याअगोदर शासनाने योग्य ते पाऊल उचलून कर्जमाफी, स्वामिनाथन आयोगाची शिफारस मान्य करून शेतकऱ्यांना चांगले दिवस दाखवावेत, अशी अपेक्षा खा. शेट्टी यांनी व्यक्त केली.