जिल्ह्यात कृषी पंपांच्या भारनियमनात कपात

By Admin | Updated: November 21, 2014 00:29 IST2014-11-20T22:41:12+5:302014-11-21T00:29:58+5:30

रेट्याला यश : रात्रीचा दहा तास वीज पुरवठा

Reduction of agricultural pumps in the district | जिल्ह्यात कृषी पंपांच्या भारनियमनात कपात

जिल्ह्यात कृषी पंपांच्या भारनियमनात कपात

सांगली : महावितरण कंपनीने कृषी पंपांचे रात्रीचे दोन तासांचे भारनियमन कमी करून ते दहा तास केले आहे़ दिवसाही एक तास भारनियमन कमी करून आठ तास अखंडित वीज पुरवठा देण्यात येईल, असे आश्वासन महावितरणचे अधीक्षक अभियंता एम़ जी़ शिंदे यांनी दिले आहे़ शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कृषी पंपांच्या जादा भारनियमनाविरोधात महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती़ याची दखल घेऊनच भारनियमन कपात केल्याचे संजय कोले यांनी सांगितले़
वर्षभरापूर्वी महावितरण कंपनीने कृषी पंपांसाठी रात्रीचे दहा तास आणि दिवसा आठ तास वीज देण्याचे मान्य केले होते़ उर्वरित कालावधित भारनियमन असणार आहे़ अचानक काही तांत्रिक त्रुटी दाखवून महावितरण अधिकाऱ्यांनी भारनियमनात रात्री दोन तास, तर दिवसा एक तास वाढ केली होती़ गुपचूप हे भारनियमन वाढविल्यामुळे शेतकऱ्यांनीही याकडे दुर्लक्ष केले होते़ काही शेतकऱ्यांनी अखंडित वीज पुरवठा होत नसल्याच्या तक्रारी अधिकाऱ्यांकडे केल्या होत्या़ यावेळी अधिकारी तांत्रिक बिघाडाचे कारण सांगून वेळ मारून नेत होते़
शेतकरी संघटनेकडे या तक्रारी आल्या होत्या़ शरद जोशीप्रणित शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ऊर्जामंत्री आणि महावितरणचे मुख्य अभियंता यांची मुंबईत भेट घेतली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी अतिरिक्त भारनियमन रद्द करण्याचे आश्वासन दिले होते़ तरीही जिल्ह्यातील जादा भारनियमन कमी झाले नाही़ म्हणून शेतकरी संघटना युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष संजय कोले, जिल्हाप्रमुख शीतल राजोबा, एम़ के. माही, रावसाहेब दळवी, सुरेश केडगे, शंकर कापसे आदींच्या शिष्टमंडळाने सांगली जिल्ह्याचे महावितरणचे अधीक्षक अभियंता शिंदे यांची भेट घेतली़
यावेळी त्यांनी कृषी पंपाचे रात्रीचे दोन तास आणि दिवसाचे एक तास जादा भारनियमन रद्द करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे़ यापुढे कृषी पंपाला रात्री दहा आणि दिवसा एक तास भारनियमन असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे, अशी माहिती संजय कोले यांनी दिली आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Reduction of agricultural pumps in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.