तासगावमध्ये बेदाण्याचा विक्रम
By Admin | Updated: August 5, 2014 00:14 IST2014-08-04T23:54:11+5:302014-08-05T00:14:33+5:30
शेतकऱ्यांना दिलासा : किलोला ४५१ रुपये दर, आजवरचा सर्वाधिक भाव

तासगावमध्ये बेदाण्याचा विक्रम
तासगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत निघालेल्या सोमवारच्या बेदाणा सौद्यात हिरव्या बेदाण्याला उच्चांकी ४५१ रुपये दर मिळाला. हा आतापर्यंतचा सर्वाधिक दर आहे. सदाशिव महादेव माळी (रा. खरशिंग) या उत्पादकाचा हा बेदाणा आहे. या दराने त्यांच्या ३१५ किलो बेदाण्याची आज विक्री झाली.
गेल्या महिन्याभरापासून बेदाण्याच्या दरात जबरदस्त वाढ होताना दिसत आहे. प्रत्येक आठवड्यात दराचे नवे विक्रम होत असल्याचे चित्र आहे. यापूर्वी ४0१ रुपये दराने बेदाणा विक्री झाली होती. आज ४५१ रुपये सर्वात जास्त दर मिळाला. सोमनाथ ट्रेडर्स या दुकानात झालेल्या सौद्यात ४५१ रुपये दराने रोहिणी ट्रेडिंग कंपनी यांनी हा बेदाणा खरेदी केला.
आजच्या सौद्यात एकूण ५२0 टन बेदाण्याची आवक झाली होती. यापैकी ४४0 टन बेदाण्याची विक्री झाली. हिरव्या बेदाण्यास १९0 ते ४५१, पिवळ्या बेदाण्यास १६२ ते २२0, तर काळ्या बेदाण्यास ५५ ते ९५ असे सरासरी दर मिळाले.
याच आठवड्यात २ आॅगस्ट रोजी (शनिवारी) निघालेल्या बेदाणा सौद्यात हिरव्या बेदाण्याला किलोला उच्चांकी ४०१ रुपये दर मिळाला होता. तासगावातील बेदाणा उत्पादक जालिंदर जगताप यांच्या ३५0 किलो बेदाण्याची या दराने विक्री झाली होती.
बाजार समितीमधील श्रीनिवास ट्रेडर्स या दुकानातील बेदाणा सौद्यात ४०१ रुपये उच्चांकी दर देऊन हा ३५० किलो बेदाणा खरेदी केला होता. बेदाण्याचा हा नवीन उच्चांक झाल्याने बेदाणा पाहण्यास व्यापारी तसेच खरेदीदारांनीही गर्दी केली होती. आता हा विक्रमही आज मोडीत निघाला. गेल्या महिन्याभरात बेदाण्याला चांगला दर मिळत असून, ३७०, ३९० या उच्चांकी दराचे विक्रम मोडत आज पहिल्यांदाच बेदाण्याने ४५0 रुपयांचा टप्पा पार केला. तासगावातील बेदाणा सौद्यात बेदाण्याला चांगला दर मिळत असून, शेतकऱ्यांनी बेदाणा उत्पादकांनी खासगी पद्धतीने बेदाणा विक्री करु नये, असे आवाहन बाजार समितीचे सभापती अनिल पाटील व सचिव चंद्रकांत सूर्यवंशी यांनी केले आहे. (वार्ताहर)