पती मुका, पत्नी अपंग : तासगावात तहसीलदारांकडून माणुसकीचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 19:01 IST2020-03-04T18:56:40+5:302020-03-04T19:01:28+5:30
यानिमित्ताने तहसीलदार कल्पना ढवळे यांनी प्रशासकीय कामात एक वेगळीच छाप पाडून, आम्ही सर्वसामान्यांच्या अडचणीसाठी तत्पर आहोत, असे दाखवून दिले आहे. या बाटे कुटुंबीयांच्या हातात रेशनकार्ड देताच त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला.

तासगाव येथे तहसीलदार कल्पना ढवळे यांच्याहस्ते दिव्यांग कुटुंबास रेशन कार्ड प्रदान करण्यात आले. यावेळी निसार मुल्ला उपस्थित होते.
तासगाव : तासगाव येथील दिव्यांग बाळासाहेब महादेव बाटे यांना केवळ पाचच मिनिटात रेशनकार्ड देऊन तहसीलदार कल्पना ढवळे यांनी माणुसकीचे दर्शन घडविले.
तासगाव येथील बाळासाहेब महादेव बाटे (वय ५६, रा. मारुती मंदिरमागे, वरचे गल्ली, तासगाव) हे पूर्णपणे मुके आहेत. त्यांच्या पत्नी शालन याही अपंग आहेत. या दाम्पत्यास तिन्ही मुलीच. यातील एकीचे लग्न झाले आहे, तर दोन मुली घरीच असतात. शेजारी राहणारे नगरपालिकेतील कर्मचारी महादेव लुगडे, अय्युब मणेर यांनी तासगाव येथील रुग्णसेवक व सामाजिक कार्यकर्ते निसार मुल्ला यांना बाटे कुटुंबीयाला अपंगत्वाचा दाखला, अपंग पेन्शन, मोफत बस पास आदी शासकीय सवलती मिळवून देण्याची विनंती केली. त्यांनी बाटे कुटुंबीयांची माहिती घेतली असता, त्यांच्याकडे रेशनकार्ड नसल्याचे समजले.
सरकारी कामात सर्वप्रथम रेशनकार्ड गरजेचे असल्याने निसार मुल्ला यांनी लुगडे यांनी बाटे पती-पत्नीस घेऊन तहसील कार्यालय गाठले. मुल्ला यांनी तहसीलदार कल्पना ढवळे यांना बाटे कुटुंबाची माहिती दिली. कागदपत्रांची खातरजमा करून तहसीलदारांनी रेशनिंग विभागातील कर्मचारी शालन ढेरे व राहुल गेंड यांना बोलावून रेशन कार्ड देण्याचे आदेश दिले. त्यांनीही तात्काळ कार्ड तयार करून तहसीलकारांकडे सहीसाठी आणले. ढवळे यांनी नवीन शिधापत्रिकेवर हस्ताक्षर करून या जोडप्याची अनेक वर्षांपासूनची अडचण दूर केली.
यानिमित्ताने तहसीलदार कल्पना ढवळे यांनी प्रशासकीय कामात एक वेगळीच छाप पाडून, आम्ही सर्वसामान्यांच्या अडचणीसाठी तत्पर आहोत, असे दाखवून दिले आहे. या बाटे कुटुंबीयांच्या हातात रेशनकार्ड देताच त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला.