कोकरूडमध्ये आढळले दुर्मीळ फुलपाखरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:18 IST2021-06-18T04:18:43+5:302021-06-18T04:18:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : जगातील सर्वात मोठ्या पतंगापैकी एक असलेले ‘एटॅकस एटलास मॉथ’ हे दुर्मीळ आणि आकर्षक फुलपाखरू ...

कोकरूडमध्ये आढळले दुर्मीळ फुलपाखरू
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : जगातील सर्वात मोठ्या पतंगापैकी एक असलेले ‘एटॅकस एटलास मॉथ’ हे दुर्मीळ आणि आकर्षक फुलपाखरू कोकरूड (ता. शिराळा) येथे सापडले आहे. आशिया खंडातील जंगलात आढळणाऱ्या स्थानिक प्रजातींतील हे फुलपाखरू आनंदा घोडे यांच्या घरी दिसून आले. २३ सप्टेंबर २०२० मध्येही हे पतंग याच गावात आढळून आले होते.
या प्रजातीस ‘पतंग’ फुलपाखरू म्हणून संबोधले जाते. रंगीबेरंगी फुलपाखराच्या पंखात दोन्ही बाजूला आकर्षक असलेल्या नक्षीने आणि रंगांनी घरातील सदस्यांचे आणि शेजारच्या लोकांचे लक्ष वेधले. सर्वांनी कुतूहलाने त्याची छायाचित्रेही काढली. या पतंगाविषयी घरातील प्रियांका घोडे हिने गुगलवर या प्रजातीबद्दल माहिती शोधली असता ते दुर्मीळ आणि जगातील सर्वात मोठ्या पतंगांपैकी एक असलेले ‘एटॅकस एटलास मॉथ’ असल्याचे समजले.
त्याचा रंग आकर्षक, लालसर तपकिरी व किंचित रेशमी आहे. पंखांवर नकाशाप्रमाणे मोठे पांढरे ठिपके आहेत. त्यामुळेच त्याला ‘एटॅकस एटलास मॉथ’ म्हणतात. याचे खास वैशिष्ट्य म्हणजे याला तोंड किंवा पचनसंस्था नसते. सुरवंटरूपात असतानाच त्याने भरपूर खाऊन घेतलेले असते. या पतंगाचे आयुष्य जेमतेम एक ते दोन आठवडे असते. मादी शरीरातून एक प्रकारचा रासायनिक द्रव्य सोडते. याचा वास कित्येक किलोमीटर दूर जाऊन, नर आणि मादीचे मीलन झाल्यावर अंडी देऊन मादी मरण पावते. फुलपाखरांची एटलास ही जात आशिया खंडातील जंगलात आढळणारी स्थानिक प्रजाती आहे. आठ इंच लांबीचे हे फुलपाखरू सुमारे २०० अंडी घालते. २७ सेंटीमीटरपर्यंत पंख पसरू शकते. ही प्रजाती नष्ट होत चालली असून महाराष्ट्रात हे फुलपाखरू भीमाशंकरच्या जंगलात आढळून आल्याचे सांगितले जाते.
चौकट
२३ सप्टेंबर २०२० मध्ये कोकरूड येथील पाटबंधारे विभाग कार्यालयाच्या समोर तुळशीच्या झाडावर जगातील सर्वात मोठ्या पतंगापैकी एक असलेले एटलास माॅथ फुलपाखरू काही काळ विसावले होते.