रस्ते कामात पावणेदोन लाखाचा गैरव्यवहार
By Admin | Updated: January 3, 2015 00:12 IST2015-01-02T23:21:18+5:302015-01-03T00:12:32+5:30
दिघंचीतील प्रकार : माजी सरपंचासह चौघांवर गुन्हा

रस्ते कामात पावणेदोन लाखाचा गैरव्यवहार
आटपाडी : ‘जाऊ तिथं खाऊ’ या चित्रपटातील विहीर चोरीला गेल्याचा दुसरा प्रकार दिघंची (ता. आटपाडी) येथे घडला आहे. फरक इतकाच की, इथे विहिरीऐवजी चक्क डांबरी रस्ता ‘चोरीला’ गेला आहे. रस्ता न करताच रस्त्याचे काम पूर्ण केल्याचे कागदोपत्री दाखवून दिघंचीचे तत्कालीन सरपंच हणमंतराव देशमुख, ग्रामविकास अधिकारी सुनील कोरे (रा. कळंबी, ता. मिरज), पं. स.चे उपशाखा अभियंता (बांधकाम) यांनी एक लाख ७३ हजार ५0९ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी आज, शुक्रवारी आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
आटपाडी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी कृष्णदेव पाटील यांनी फिर्याद दिली आहे. यामध्ये दलित वस्ती सुधार योजना २0११ चे अंतर्गत ३१ मार्च २0११ रोजी दिघंचीतील बौध्द वस्तीत राहणाऱ्या धर्मराज रणदिवे यांचे घर ते कैलास रणदिवे यांच्या घरापर्यंत करावयाचा डांबरी रस्ता व गटारीचे काम मंजूर केले होते. १ मार्च २0११ ते १७ जून २0११ या कालावधित तत्कालीन सरपंच देशमुख, ग्रामविकास अधिकारी कोरे, आटपाडी पंचायत समितीचे उपअभियंता किंवा शाखा अभियंता यांनी संगनमत करुन खोटी कागदपत्रे तयार केली. अभियंत्यांनी तांत्रिक बिलांची छाननी करुन रस्ता आणि गटारीचे काम पूर्ण केल्याचे माप पुस्तकात नोंद केले आणि या कामाचे मूल्यांकन १ लाख ७३ हजार ५0९ केले.
वास्तविक या ठिकाणी गेल्या १0 ते १५ वर्षात त्या रस्त्यावर कोणतेही काम झाले नाही. त्यामुळे देशमुख, कोरे आणि अभियंत्यावर भा. दं. वि. संहिता कायदा ४0८, ४२0, ४६४, ४६८, ४७१ आणि ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील करीत आहेत. (वार्ताहर)
कारवाईस स्थगिती
अपहारप्रकरणी दोषी धरलेले माजी सरपंच हणमंतराव देशमुख आणि ग्रामसेवक यांच्यावरील फौजदारी कारवाईस जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तात्पुरती स्थगिती दिली आहे.