जिल्ह्यातील दोन मंत्र्यांमुळेच कार्यकर्त्यांना हद्दपारीची नोटीस : राजू शेट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 16:31 IST2019-10-10T16:30:27+5:302019-10-10T16:31:23+5:30
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांवर हद्दपारीची नोटीस बजावली. यामागे जिल्ह्यातील दोन मंत्र्यांचे कटकारस्थान असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत केला.

जिल्ह्यातील दोन मंत्र्यांमुळेच कार्यकर्त्यांना हद्दपारीची नोटीस : राजू शेट्टी
सांगली : कडकनाथप्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या मोटारीवर कोंबड्या फेकल्याच्या गुन्ह्याबद्दल जिल्हाध्यक्ष महेश खराडे आणि वाळवा तालुकाध्यक्ष भागवत जाधव यांना दोन वर्षाची हद्दपारीची नोटीस बजावली आहे. यामागे जिल्ह्यातील दोन मंत्र्यांचे कटकारस्थान असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी नाव न घेता येथे पत्रकार परिषदेत केला. या दडपशाही पध्दतीला जनतेनेच उत्तर द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
ते म्हणाले की, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मागील तीस वर्षापासून चळवळीत काम करीत आहे. परंतु,असा वाईट अनुभव आतापर्यंत आलेला नाही. खून, बलात्कार, मटका, बनावट दारू विक्री यातील बहुतांशी आरोपी जामिनावर बाहेर आहेत. परंतु शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्यांना सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार करण्याची नोटीस बजावली जात आहे, हा कोणता न्याय आहे? विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली आहे.
सध्याचे सरकार काळजीवाहू आहे. मात्र सरकारमधील जिल्ह्यातील दोन मंत्री अधिकार नसतानाही सत्तेचा गैरवापर करीत आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांवरील हद्दपारीच्या कारवाईमागे त्यांचाच हात आहे.
ते म्हणाले की, आचारसंहितेत मंत्र्यांना कोणतेही अधिकार नसतात. मात्र सत्तेचा गैरवापर करुन पोलिसांवर दबाव आणून स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांवर हद्दपारीची कारवाई केली जात आहे. दडपशाही होणार असेल तर आम्ही जनतेच्या प्रश्नांवर चळवळी करायच्या नाहीत का? १९९५ मध्ये युती सरकारच्या काळातही असे प्रकार घडले नव्हते. मात्र सध्याच्या सरकारकडून शासकीय यंत्रणांना हाताशी धरून आवाज दाबण्याचा उद्योग सुरू आहे. लोकशाहीचा गळा दाबण्याचा हा प्रयत्न आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष महेश खराडे, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, बाळासाहेब होनमोरे, किसान सभेचे उमेश देशमुख आदी उपस्थित होते.