नगराध्यक्ष पदासाठी राजू म्हेत्रेंचे पारडे जड
By Admin | Updated: September 9, 2016 01:14 IST2016-09-09T00:07:01+5:302016-09-09T01:14:37+5:30
तासगाव नगरपालिका : खासदारांकडून शिक्कामोर्तब; अनिल कुत्तेंना दे धक्का; राष्ट्रवादीचाही अर्ज

नगराध्यक्ष पदासाठी राजू म्हेत्रेंचे पारडे जड
तासगाव : तासगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी गुरुवारी भाजपकडून नगरसेवक राजू म्हेत्रे यांचे पारडे जड ठरले. अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी खासदार संजयकाका पाटील यांनी म्हेत्रे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. भाजपच्या गोटात ही निवड अनपेक्षित मानली जात असून, नगरसेवक अनिल कुत्ते यांच्यासाठी हा धक्का मानला जात आहे. राष्ट्रवादीकडूनही यावेळी नगरसेवक सुरेश थोरात यांचा अर्ज दाखल झाला आहे.
तासगाव नगरपालिकेतील विद्यमान कारभाऱ्यांची ही अखेरची टर्म आहे. तत्कालीन नगराध्यक्ष अविनाश पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर, नगराध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळात पडणार, याची उत्सुकता होती. गुरुवारी अर्ज दाखल करण्यासाठी अखेरची मुदत होती. नगरसेवक अनिल कुत्ते यांचे नाव अंतिम असल्याची चर्चा भाजपच्या वर्तुळात होती. मात्र गुरुवारी सकाळी शासकीय विश्रामगृहावर खासदार संजयकाका पाटील यांनी नगरसेवक अविनाश पाटील, बाबासाहेब पाटील, राजू म्हेत्रे आणि अनिल कुत्ते यांच्यासोबत बैठक घेतली. सर्वांची मते जाणून घेतल्यानंतर नगराध्यक्ष पदासाठी राजू म्हेत्रे यांचे नाव जाहीर केले. त्यानंतर म्हेत्रे यांनी मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांच्याकडे अर्ज दाखल केला. यावेळी नगरसेवक अविनाश पाटील, बाबासाहेब पाटील, अनिल कुत्ते, जाफर मुजावर, बाळासाहेब जामदार, दिनकर धाबुगडे, बापू धोत्रे उपस्थित होते.
दरम्यान, भाजपअंतर्गत कुरघोड्यांची कुणकुण लागल्यामुळे भाजपांतर्गत नाराजीचा फायदा उठविण्यासाठी राष्ट्रवादीकडूनही अर्ज दाखल करण्यात आला. नगरसेवक सुरेश थोरात यांनी अर्ज दाखल केला. या अर्जाचीही उलटसुलट चर्चा होत होती. १६ तारखेला अर्ज माघारीची मुदत आहे. त्यावेळी थोरात यांचा अर्ज मागे घेतला जाण्याची शक्यता असून १७ तारखेला नगराध्यक्ष निवड होणार आहे. (वार्ताहर)
कुत्ते समर्थकांची नाराजी
नगरसेवक अनिल कुत्ते यांचे नाव नगराध्यक्ष पदासाठी अंतिम मानले जात होते. त्यामुळे गुरुवारी त्यांचाच अर्ज दाखल होणार, याची खात्री कुत्ते समर्थकांसह अनेक भाजपच्या नगरसेवकांनादेखील होती. मात्र ऐनवेळी खासदारांनी राजू म्हेत्रे यांचे नाव जाहीर केल्यामुळे अनिल कुत्तेसमर्थक कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली.