ड्रोनद्वारे औषध फवारणी करणारा राजारामबापू राज्यातील पहिला कारखाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:17 IST2021-07-05T04:17:41+5:302021-07-05T04:17:41+5:30
इस्लामपूर : ड्रोनद्वारे शेतात खते व औषधे फवारणी करणारा राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना हा राज्यातील पहिला साखर कारखाना ...

ड्रोनद्वारे औषध फवारणी करणारा राजारामबापू राज्यातील पहिला कारखाना
इस्लामपूर : ड्रोनद्वारे शेतात खते व औषधे फवारणी करणारा राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना हा राज्यातील पहिला साखर कारखाना ठरला असल्याचे गौरवोद्गार व्हीएसआय या साखर उद्योगातील शिखर संस्थेचे संचालक विकास देशमुख यांनी काढले.
देशमुख यांनी राजारामबापू कारखान्याच्या माध्यमातून आष्टा व कारंदवाडी येथील शेतकऱ्यांच्या शेतातील ड्रोनद्वारे औषध फवारणी प्रात्यक्षिकांची पाहणी करून कारखाना कार्यस्थळास भेट दिली. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष पी.आर. पाटील यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी श्रेणिक कबाडे, विराज शिंदे, शास्त्रज्ञ एस.ए. दळवी, सुभाष जमदाडे उपस्थित होते.
देशमुख म्हणाले, जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साखर कारखान्याने सातत्याने अद्ययावत तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेतकऱ्यांना नवनवीन सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. ड्रोनसाठी डीजीसीची परवानगी घेण्यासाठी प्रयत्नशील आहोत. लवकरच ही परवानगी मिळेल. त्यामुळे ड्रोन वापरण्यास अडचण राहणार नाही. कारखान्याने राबविलेल्या लक्ष्य एकरी १०० टनाचे या उपक्रमामुळे साडेतीन हजार शेतकरी शंभर टनाच्या वरती एकरी उत्पादन घेत आहेत. हा आदर्श इतर कारखान्यांनी घ्यायला हवा.
पी.आर. पाटील म्हणाले, आम्ही नेहमीच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञान उपलब्ध करून देत आहोत. कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन घेणे, हा आमचा प्रयत्न आहे. वाळवा तालुक्यात पंजाब, हरियाणाच्या तुलनेत ९३ टक्के क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. केंद्र शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेती व सहकार अडचणीत आला आहे. साखरेला दर किती मिळतो आणि उत्पादन खर्च किती येतो? याचा ताळमेळ घालायला हवा. केंद्र सरकार साखरेला दर वाढवून देत नाही, तोपर्यंत अडचणी संपणार नाहीत. अनेक कारखाने इथेनॉल निर्मितीकडे वळले आहेत.
सुभाष जमदाडे यांनी स्वागत केले. मुख्य शेती अधिकारी प्रशांत पाटील, ऊस विकास अधिकारी सुजय पाटील, शंकर पाटील उपस्थित होते. विराज शिंदे यांनी आभार मानले.
फोटो : ०४ इस्लामपूर २
ओळी : राजारामनगर येथे व्हीएसआयचे संचालक विकास देशमुख यांचा सत्कार पी.आर. पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी संचालक विराज शिंदे, श्रेणिक कबाडे, सुभाष जमदाडे,एस.ए.दळवी उपस्थित होते.