हजारावर इमारतींवर पर्जन्य जलसंवर्धन

By Admin | Updated: August 21, 2014 00:27 IST2014-08-20T23:36:21+5:302014-08-21T00:27:27+5:30

महापालिका क्षेत्र : पाणीटंचाई टाळण्यासाठी उपाययोजना

Rainwater Harvesting on Hazarawar Buildings | हजारावर इमारतींवर पर्जन्य जलसंवर्धन

हजारावर इमारतींवर पर्जन्य जलसंवर्धन

नरेंद्र रानडे-सांगली -महापालिका क्षेत्रातील सुमारे एक हजार पर्यावरणप्रेमी कुटुंबांनी तसेच शासकीय कार्यालयांनी पर्जन्य जलसंवर्धन प्रकल्प स्वीकारला आहे. भविष्यकाळात यामध्ये वाढ होण्याची आवश्यकता आहे. पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर हे आशादायक चित्र मानले जात आहे.
पावसाचे पडणारे पाणी सर्वात शुध्द पाणी म्हणून ओळखले जाते. परंतु ज्यावेळी मुसळधार पाऊस पडतो, त्यावेळी लाखो लिटर पाणी वाया जाते. ते साठविण्याच्या गरजेतूनच ‘पर्जन्य जलसंवर्धन’ संकल्पनेचा जन्म झाला. हल्ली बहुतांशी घरात कूपनलिका असते. उन्हाळ्यात बऱ्याच ठिकाणी जमिनीतले झरे आटल्यामुळे कूपनलिकेच्या पाण्यात घट होते. हे चित्र बदलण्याची शक्ती ‘पर्जन्य जलसंवर्धना’मध्ये आहे. घराच्या अथवा कार्यालयांच्या गच्चीवर पावसाचे पडणारे पाणी सुनियोजित पध्दतीने पाईपच्या साहाय्याने पुन्हा कूपनलिकेमध्येच सोडले गेले, तर जमिनीखालील पाणी पातळीत वाढ होण्यास मदत होते. मुख्य म्हणजे क्षारांचे प्रमाण कमी होते. काही वर्षांपूर्वीपर्यंत छतावर पडलेले पाणी कूपनलिकेच्या कडेला सोडले जात होते. याकरिता तेथे मुरुम लागेपर्यंत मोठा खड्डा काढण्यात येत होता. त्यामध्ये नदीपात्रातील गोटे, खडी आणि वाळू असा त्रिस्तरीय थर घालण्यात येत होता. कालांतराने ही पध्दत मागे पडून, पाणी शुध्द करण्याच्या उपकरणाच्या सहाय्याने कूपनलिकेच्या केसिंग पाईपमध्येच थेट पावसाचे पाणी सोडण्यात येते. या संपूर्ण प्रकल्पासाठी ५ ते १० हजार रुपयांपर्यंत खर्च येतो.
सामान्य माणूस दिवसाला तीन लिटर पाणी पितो. कुटुंबामध्ये पाच माणसे असतील, तर दिवसाला पिण्यासाठी पंधरा लिटर पाणी लागते. म्हणजेच एका कुटुंबाला वर्षाला सरासरी ५,४०० लिटर पाण्याची आवश्यकता असते. हे लक्षात घेऊनच काही दिवसांपासून आणखी एक नवीन पध्दत राबविण्यात येत आहे. सहा हजार लिटरची हवाबंद टाकी घराच्या आवारात बसविण्यात येते. यामध्ये पावसाचे पडणारे पाणी शुध्द करून सोडण्यात येते.
महत्त्वाचे म्हणजे सूर्यप्रकाश टाकीत जाणार नाही याची पूर्ण काळजी घेण्यात येते. पावसाळ्यात पडणारे पाणी जर योग्य पध्दतीने साठवले गेले, तर निदान एका कुटुंबाची वर्षभराची पिण्याच्या पाण्याची टंचाई मिटण्यास निश्चित मदत होते.
वृक्षांची सर्रास तोड करून शहरीकरण होत आहे. यामुळे प्रत्येकवर्षी पावसाची अनिश्चितता कायम आहे. शुध्द पाणी प्यावयाचे असेल, तर प्रत्येक कुटुंबाने इतरत्र वायफळ होणारा खर्च कमी करून पर्जन्य जलसंवर्धनाद्वारे घराच्या आवारात पावसाचे पाणी हवाबंद टाकीत साठवून ‘वॉटर बॅँक’ निर्माण करणे गरजेचे आहे.
- विद्याधर शेंडगे
पर्जन्य जलसंवर्धन तज्ज्ञ

पर्जन्य जलसंवर्धन, सौरऊर्जा प्रकल्प आणि गांडूळ खत यापैकी कोणत्याही दोन उपक्रमांची अंमलबजावणी कुटुंबाने केल्यास त्यांना घरपट्टीमध्ये तीन टक्के सवलत देण्यात येते. पर्यावरण संतुलनासाठी पर्जन्य जलसंवर्धन गरजेचे असून अधिकाधिक नागरिकांनी त्याचा अवलंब करावा.
- सी. बी. चौधरी,
कर अधीक्षक, महापालिका

Web Title: Rainwater Harvesting on Hazarawar Buildings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.