पाऊस पडूनही नुकसान नाहीच?

By Admin | Updated: January 2, 2015 00:22 IST2015-01-01T23:23:26+5:302015-01-02T00:22:00+5:30

शेतकऱ्यांमधून आश्चर्य : कृषी विभागाचा अवाक करणारा अहवाल शासनाला सादर

Rain is not damaged? | पाऊस पडूनही नुकसान नाहीच?

पाऊस पडूनही नुकसान नाहीच?

रत्नागिरी : आॅक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात कोसळलेल्या पावसामुळे भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शिवाय पेरणी केलेले कुळीथ, पावट्याचे बीज वाया गेले, असे असतानासुध्दा कृषी विभागाकडून नुकसानीचा अहवाल मात्र ‘निरंक’ पाठविण्यात आला असल्याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या वर्षभरात अवेळी पावसाचे प्रमाण वाढले आहे. पावसाचे तीन महिने संपले तरीही पावसाळा काही संपलेला नाही, अशा प्रतिक्रिया आता शेतकऱ्यांमधून उमटत आहेत. कोणत्याही क्षणी मळभी वातावरण होते आणि थोड्याच वेळात पाऊस सुरू होतो, असे घडत असल्याने शेतकरी आणि बागायतदार चिंतेत सापडला आहे. बदलत्या वातावरणामुळे भातशेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आता याच वातावरणाचा परिणाम हापूसवरही होण्याची शक्यता आहे.
यावर्षी पावसाळा लांबला. ऐन दिवाळीतही सलग तीन ते चार दिवस पाऊस कोसळत होता. परिणामी कापलेल्या शेताचे नुकसान झालेच शिवाय कापणीसाठी तयार शेतीही भिजली. पेरणी केलेला कुळीथ, पावटा व अन्य भाजीपाला पिकाच्या बिजाचेही नुकसान झाले.
काही शेतकऱ्यांची मळणीही भिजली. सतत तीन ते चार दिवस कोसळत असलेल्या पावसामुळे भिजलेल्या भाताला कोंब आले. असे असतानासुध्दा तालुका कृषी कार्यालयांनी नुकसान निरंक असल्याचा अहवाल पाठवला. जिल्हा कृषी कार्यालयानेही तोच अहवाल शासनाकडे सरकविला. त्यामुळे नुकसान असतानासुध्दा शासनाला न कळविल्याबद्दल कृषी विभागाच्या अजब कारभाराबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
गेले दोन दिवसही हवामानात प्रामुख्याने बदल जाणवू लागला आहे. पाऊस पडत असल्यामुळे कलमाच्या मोहोराचे नुकसान होण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरणामुळे तुडतुडा व किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. शिवाय पावसामुळे मोहोर कुजण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी गारा व वाऱ्यासह मोहोरही पडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. कृषी विभागाकडून याची दखल घेऊन नुकसानीचा अहवाल पाठविण्यात येईल का ? की पुन्हा निरंक अहवाल पाठविला जाईल?
वास्तविक ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या कृषिसेवकांनी नुकसानाची दखल घेत शासनाकडे तसा अहवाल देणे गरजेचे आहे. परंतु तसे घडत नसल्यामुळेच शेतकऱ्यांना नुकसानीस सामोरे जावे लागत असल्याने कृषी खात्याबाबत नाराजी व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)


गेल्या काही महिन्यांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यावर पावसाने वक्रदृष्टी दाखवली आहे. कोणत्याही क्षणी पाऊस येत असल्याने पिकांचे मोठे नुकसान होत आहे.

Web Title: Rain is not damaged?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.