रेल्वे व्यवस्थापकांसमोर मागण्यांचा पाऊस
By Admin | Updated: August 21, 2014 00:25 IST2014-08-20T23:37:05+5:302014-08-21T00:25:54+5:30
रेल्वे व्यवस्थापक जॉन थॉमस आज मिरजेत आले

रेल्वे व्यवस्थापकांसमोर मागण्यांचा पाऊस
मिरज : सोलापूर विभागीय रेल्वे व्यवस्थापक जॉन थॉमस यांनी मिरज-पंढरपूर मार्गाचा परीक्षण दौरा केला. यावेळी प्रवासी सेना व संघाच्या कार्यकर्त्यांनी विविध समस्या त्यांच्यासमोर मांडून त्यांना मागण्यांचे निवेदन दिले.
रेल्वे व्यवस्थापक जॉन थॉमस आज मिरजेत आले होते. यावेळी प्रवासी सेना व संघटनेच्या प्रतिनिधींनी थॉमस यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन दिले. पंढरपूर सुपर फास्ट गाडीचा तिकीट दर पॅसेंजरप्रमाणे करावा, मिरज-हैदराबाद एक्स्प्रेस पंढरपूर-सोलापूर मार्गे सुरू करावी, मिरज-पंढरपूर सोलापूर मार्गे मिरज-शहाबाद-वाडी पॅसेंजर सुरू करावी, सलगरे व कवठेमहांकाळ या रेल्वेस्थानकांवर एक्स्प्रेस थांबवाव्यात, कोल्हापूर-सोलापूर एक्स्प्रेस गाडी सकाळी सोडण्यात यावी, पंढरपूर-मिरज-हुबळी मार्गावर धावणाऱ्या पॅसेंजर गाड्यांची स्वच्छता व पाणी भरण्याची व्यवस्था पंढरपूर स्थानकावर करावी, मिरज-पंढरपूर मार्गावरील आरग, सलगरे, बेळंकी, ढालगाव, कवठेमहांकाळ व जतरोड ही सांगली जिल्ह्यातील रेल्वे स्थानके मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाकडून पुणे विभागाकडे हस्तांतरित करावीत, आदी मागण्यांचे निवेदन व्यवस्थापक थॉमस यांना देण्यात आले. कोल्हापूर-सोलापूर एक्स्प्रेस पुढील महिन्यापासून सकाळी सुरू करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे थॉमस यांनी सांगितले.
स्थानक अधीक्षक एम. एस. मसूद, रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष ए. ए. काझी, प्रवासी सेनेचे किशोर भोरावत, संदीप शिंदे, चंद्रकांत मैगुरे, महेश म्हेत्रे, ज्ञानेश्वर पोतदार, पप्पू शिंदे, अनिल रसाळ, मधुकर साळुंखे, आप्पा नाईक उपस्थित होते. (वार्ताहर)