रेल्वेत सफाई कर्मचारी महिलेचा विनयभंग
By Admin | Updated: May 5, 2015 00:49 IST2015-05-05T00:37:57+5:302015-05-05T00:49:22+5:30
मुकादमास अटक : गुन्हा दाखल

रेल्वेत सफाई कर्मचारी महिलेचा विनयभंग
मिरज : मिरज रेल्वे स्थानकात रेल्वे डब्याची सफाई करणाऱ्या एका दलित महिलेशी गैरवर्तन केल्याप्रकरणी शानूर ऊर्फ इसामुद्दीन कुडचीकर (वय ४३, रा. कोल्हापूर चाळ, मिरज) या मुकादमाविरूद्ध दलित अत्याचार व विनयभंगाचा गुन्हा रेल्वे पोलिसात दाखल झाला आहे.
मिरज रेल्वे स्थानकात रेल्वे गाड्यांची स्वच्छता व साफसफाईचा ठेका स्मार्ट प्रोसेसर्स या पुण्यातील कंपनीला देण्यात आला आहे. या खासगी कंपनीकडे १४ सफाई कामगार असून त्यातील सात महिला आहेत. दि. २५ रोजी रात्री ११ वाजता एक ३० वर्षीय महिला रेल्वे डब्यातील शौचालयाची स्वच्छता करीत असताना, कंपनीत मुकादम म्हणून काम करणारा शानूर कुडचीकर तेथे आला. रात्रीच्या वेळी तेथे कोणी नसल्याचा फायदा घेऊन शानूरने या महिलेशी गैरवर्तन केले. महिलेने त्यास विरोध करताच शानूर याने जातीवाचक शिवीगाळ करून, हा प्रकार कोणाला न सांगण्याची धमकी दिली.
संबंधित महिलेने याबाबत सोमवारी मिरज रेल्वे पोलिसांत फिर्याद दिली असून, मुकादमावर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी शानूर कुडचीकर यास अटक केली असून, त्याला दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. (वार्ताहर)