मिरज : मिरजरेल्वे स्थानकात शुक्रवारी दुपारी इंधन वाहून नेणारे मोकळ्या वॅगन रेल्वे मार्गावरून घसरल्याने रेल्वे वाहतूक दोन तास ठप्प झाली होती.मिरज जंक्शनमधील मुख्य मार्गावर हा अपघात झाल्याने रेल्वे वाहतूक ठप्प झाली. मिरज रेल्वे स्थानकातून इंधन वाहून नेणारे मोकळे वॅगन दुपारी तीन वाजता पुण्याकडे जात होते. मिरज स्थानकातून बाहेर पडताच मुख्य रेल्वे मार्गावरून चार वॅगन घसरल्यामुळे मिरज ते पुणे रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली.
त्यामुळे मिरज स्थानकात कोल्हापूर ते गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस, सांगली स्थानकात सांगली ते बंगळुरू राणी चन्नम्मा एक्सप्रेस थांबवून ठेवली. मुख्य रेल्वे मार्गावर हा अपघात झाल्याने वॅगन हटविण्यासाठी रेल्वे अधिकाऱ्यांची धावपळ उडाली होती.
दोन तासांच्या प्रयत्नाने घसरलेले वॅगन हटवून रेल्वे वाहतूक पुन्हा सुरू केली. वॅगन घसरलेल्या या मालगाडीला गार्ड नसल्याचा प्रकारही अपघातामुळे निदर्शनास आला. अपघातामुळे प्रवासी रेल्वे गाड्यांना विलंब झाल्याने प्रवाशांचे हाल झाले.