बनावट नोटाप्रकरणी संशयिताच्या घरावर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:10 IST2021-01-13T05:10:44+5:302021-01-13T05:10:44+5:30
सांगली : बनावट नोटा प्रकरणातील मुख्य संशयित तेजस गोरे याच्या मोरोची (ता. माळशिरस) येथील घरावर कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी मंगळवारी ...

बनावट नोटाप्रकरणी संशयिताच्या घरावर छापा
सांगली : बनावट नोटा प्रकरणातील मुख्य संशयित तेजस गोरे याच्या मोरोची (ता. माळशिरस) येथील घरावर कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी मंगळवारी छापा टाकला. पोलिसांनी घेतलेल्या झडतीत काही आक्षेपार्ह आढळले नसल्याचे सहायक निरीक्षक नीलेश उबाळे यांनी सांगितले.
बनावट नोटाप्रकरणी विजय कोळी, शरद हेगडे, तेजस ऊर्फ भावड्या गोरे यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, फोटोशॉपद्वारे दोन हजार आणि दोनशेच्या बनावट नोटा तयार करणाऱ्या संशयितांनी नोटांच्या छपाईसाठी लागणारा कागद सांगलीतून खरेदी केल्याची कबुली दिली आहे. रविवारी कुपवाड पोलिसांनी सांगलीत राहणाऱ्या दोन संशयितांच्या घराची झडतीही घेतली. संशयित कोळी आणि हेगडे या दोघांनी मोरोची (ता. माळशिरस) येथील तेजस गोरे याच्या दुकानात नोटांच्या प्रिंट काढल्याची माहिती दिली होती. नंतर पोलिसांनी तेजसला अटक केली. त्याच्याकडून प्रिंटर, स्कॅनर, एलसीडी स्क्रीन, ९० हजारांच्या बनावट नोटा असा मुद्देमाल जप्त केला होता.
त्यानंतर मुख्य संशयित तेजस गोरे याच्या मोरोची येथील घराची मंगळवारी झडती घेण्यात आली. सकाळीच पोलिसांचे पथक मोरोचीला गेले होते. रात्री उशिरा ते पथक परत आले. दरम्यान, मोरोची येथील छाप्यात विशेष माहिती हाती लागली नसल्याचे उबाळे यांनी सांगितले.