लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्हा काँग्रेसअंतर्गत संघटना बदलाचे वारे वाहू लागले आहेत. सांगली शहर व ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाच्या निवडी येत्या पंधरा दिवसांत होणार आहेत. त्यासाठी वसंतदादा आणि पतंगराव कदम गटात जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. वसंतदादांचे नातू विशाल पाटील, जतचे आमदार विक्रम सावंत, पतंगरावांचे जावई महेंद्र लाड यांची नावे ग्रामीण जिल्हाध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत. शहर जिल्हाध्यक्षपदासाठी पृथ्वीराज पाटील यांचे एकमेव नाव असले तरी ऐनवेळी मदनभाऊ पाटील गटाकडूनही दावा केला जाण्याची शक्यता आहे.
काँग्रेसने संघटनात्मक पातळीवर बदलासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा नव्या दमाच्या नेत्यांकडे पक्षाची धुरा सोपविण्याकडे कल आहे. त्यातच काँग्रेसचे विद्यमान जिल्हाध्यक्ष आमदार मोहनराव कदम यांचा दहा वर्षांचा कार्यकाल पूर्ण होत आला आहे. नुकतेच जिल्हाध्यक्षपदासाठी सर्वच तालुकाध्यक्ष, कार्यकारिणी सदस्य, नगरसेवकांची ऑनलाइन मते जाणून घेण्यात आली. पुढील आठवड्यात राज्य विधिमंडळाचे अधिवेशन आहे. या अधिवेशनानंतर जिल्हाध्यक्ष व इतर पदाधिकारी बदलावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे.
या पदासाठी वसंतदादा व पतंगराव कदम गटात पुन्हा सामना होणार आहे. वसंतदादा गटातून वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांच्यासाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. आटपाडी, मिरज, वाळवा, शिराळ्यासह काही तालुकाध्यक्षांसह शहरातील नगरसेवकांचे त्यांच्या नावाला समर्थन आहे. कदम गटाकडून जतचे आमदार विक्रम सावंत यांचे नाव समोर आणले आहे. सावंत यांच्यासोबत पतंगरावांचे जावई, जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड यांच्या नावाचीही चर्चा आहे. ग्रामीणचे जिल्हाध्यक्षपद गेल्या कित्येक वर्षांपासून कदम गटाकडे आहे. त्यामुळे या पदावरील हक्क अबाधित ठेवण्यासाठी हा गटही सक्रिय झाला आहे. शहर जिल्हाध्यक्षपदाची धुरा सध्या पृथ्वीराज पाटील यांच्या खांद्यावर आहे. त्यांचे नाव आघाडीवर असले तरी मदनभाऊ पाटील गटाकडून या पदावर हक्क सांगितला जाऊ शकतो.
चौकट
दोन्ही पदे कदम गटाकडे
सध्या सांगली ग्रामीण व शहर जिल्हाध्यक्ष अशी दोन्ही पदे पतंगराव कदम गटाकडे आहेत. पूर्वी शहराचे जिल्हाध्यक्षपद वसंतदादा गटाकडे होते. आता पुन्हा वसंतदादा गटाने जिल्हाध्यक्षपदासाठी लाॅबिंग सुरू केले आहे. शहर जिल्हाध्यक्षपदापेक्षा या गटाचे लक्ष ग्रामीण अध्यक्षपदावर आहे.