२६/११ ची पुनरावृत्ती झाल्यास चोख प्रत्युत्तर

By Admin | Updated: August 22, 2014 00:52 IST2014-08-22T00:40:56+5:302014-08-22T00:52:48+5:30

आर. आर. पाटील : भिलवडीत नूतन पोलीस ठाण्याचे उदघाटन; जनतेच्या सुरक्षेसाठी पोलीस सक्षम

A quick reply to 26/11 | २६/११ ची पुनरावृत्ती झाल्यास चोख प्रत्युत्तर

२६/११ ची पुनरावृत्ती झाल्यास चोख प्रत्युत्तर

भिलवडी : देशाच्या बलस्थानावर हल्ला करून अंतर्गत सुरक्षा व्यवस्था खिळखिळी करण्याचे प्रयत्न अतिरेकी करतात, परंतु महाराष्ट्रीयन पोलीस जनतेच्या सरक्षिततेसाठी कोणत्याही संकटाचा मुकाबला करण्यासाठी सक्षम आहेत. मुंबईवर झालेल्या २६/११ च्या हल्ल्याची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न झाल्यास त्यांची थडगी महाराष्ट्रात बांधली जातील, असा सज्जड इशारा गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिला.
भिलवडी (ता. पलूस) येथे आज (गुरुवार) स्वतंत्र पोलीस ठाण्याच्या उदघाटनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राज्याचे वनमंत्री डॉ. पतंगराव कदम होते.
आर. आर. पाटील म्हणाले की, महाराष्ट्राचे पोलीस दल आपले कर्तव्य व्यवस्थितपणे पार पाडत आहेत. महिलांच्या सुरक्षिततेबाबत जागतिक पातळीवर महाराष्ट्र व मुंबई शहर प्रथम क्रमांकावर आहे. पोलीस दलामध्ये महिलांसाठी तीस टक्के आरक्षण असावे असा निर्णय केंद्राने घेतला असला तरी महाराष्ट्रात सात वर्षापासून या गोष्टींची अंमलबजावणी सुरू आहे. महाराष्ट्राने यशस्वी केलेल्या ग्रामस्वच्छता अभियान, निर्मलग्राम अभियान, तंटामुक्ती अभियान आता केंद्र सरकार देशभर राबवित आहे. मग खऱ्या अर्थाने देशात प्रगतशील कोण याचा विचार करण्याची वेळ आली आहे.
वनमंत्री डॉ. पतंगराव कदम म्हणाले की, गुंडगिरी, भानगडीचा सामान्यांना त्रास होत असून, पोलीस खात्याने त्यावर कडक कारवाई करावी म्हणजे नेत्यांच्या मागे असणारी डोकेदुखी संपेल. पोलिसांच्या निवासस्थानाचा प्रश्न गंभीर असून, गृहखात्याने तो तात्काळ सोडवावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. मान्यवरांच्याहस्ते पोलीस ठाण्याच्या उभारणीसाठी सहकार्य करणाऱ्या देणगीदारांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी कोल्हापूर विभागाचे पोलीस अधिकारी रितेशकुमार, जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. दिलीप सावंत, जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, उद्योगपती काकासाहेब चितळे, राजेंद्र पाटील, आनंदराव मोहिते, महेंद्र लाड, विजयकुमार चोपडे, विलास पाटील, डी. सी. पाटील, रमेश पाटील, पं. स. सदस्य विजय कांबळे, गिरीश चितळे, सहा. पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड, सतीश पाटील, घन:शाम सूर्यंवंशी, जे. के. पाटील, मोहन पाटील उपस्थित होते. सरपंच राहुल कांबळे यांनी प्रास्ताविक, दीपक पाटील यानी सूत्रसंचालन, दादासाहेब चौगुले यांनी आभार मानले. (वार्ताहर)

Web Title: A quick reply to 26/11

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.