लसीकरणासाठी रांगा; ज्येष्ठ नागरिकांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:27 IST2021-05-13T04:27:24+5:302021-05-13T04:27:24+5:30
सांगली : जिल्ह्यात लसीकरणासाठी केंद्रांवर गर्दी होत आहे; मात्र मागणीच्या तुलनेत पुरवठा अत्यंत कमी होत असल्याने अनेक केंद्रे बंद ...

लसीकरणासाठी रांगा; ज्येष्ठ नागरिकांचे हाल
सांगली : जिल्ह्यात लसीकरणासाठी केंद्रांवर गर्दी होत आहे; मात्र मागणीच्या तुलनेत पुरवठा अत्यंत कमी होत असल्याने अनेक केंद्रे बंद आहेत. मोजक्याच केंद्रांवर ४५ पेक्षा जास्त वयोगटातील नागरिकांना लस दिली जात आहे. दुसरीकडे १८ ते ४४ वयोगटास १८ केंद्रे निश्चित केली होती; मात्र या वयोगटातील १० टक्के नागरिकांनी नोंदणी करून लसीकरण केंद्राकडे पाठ फिरवल्याने दोन टक्के डोसही वाया गेले.
जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेस प्रारंभ केला आहे. प्रथम आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर यांना लस दिली. त्यानंतर १ मार्चपासून ६० वर्षापुढील नागरिक तसेच ४५ वर्षापुढील सहव्याधी व्यक्तींना लस दिली आहे. एक एप्रिलपासून ४५ वर्षांपुढील नागरिकांना लस दिली जात आहे. नागरिकांचा वाढता प्रतिसाद पाहून लसीकरण केंद्रांची संख्या २८० पर्यंत वाढविली आहे; मात्र मागणीच्या तुलनेत जिल्ह्यास लसीचा पुरवठा होत नसल्याने अनेक केंद्रे बंद ठेवण्याची नामुष्की आरोग्य विभागावर ओढवली. सध्या मोजकीच केंद्रे सुरू आहेत.
१८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींना ३ मेपासून लसीकरणास सुरुवात झाली; मात्र आज, गुरुवारपासून त्यांचे लसीकरण बंद केले आहे. या वयोगटासाठी १८ केंद्रे निश्चित करून कोविन ॲपवर नोंदणी केलेल्यांना लस दिली जात होती; मात्र प्रत्येक केंद्रावर नोंदणी केलेल्यांपैकी १० ते २० टक्के नागरिक पाठ फिरविली. त्यामुळे डोसही वाया गेले.
चौकट
सकाळी सातपासून रांगा
सुरक्षेच्या दृष्टीने नागरिक लस घेण्यास प्राधान्य देत आहेत. सध्या मोजकीच लस उपलब्ध होत असल्यामुळे सकाळी सातपासून नागरिक रांगा लावून थांबत आहेत.
चौकट
दुसऱ्या डोससाठी धावपळ
जिल्ह्यात ९० टक्के कोविशिल्ड, तर १० टक्के कोव्हॅक्सिन लसीचा पुरवठा आहे. पहिला डोस घेऊन ४५ दिवस झाल्यानंतरही लस मिळत नसल्यामुळे जेथे लस उपलब्ध असेल, तिथे जाऊन लस मिळवली जात आहे. शहरातील नागरिक ऑनलाइन नोंदणी करून ग्रामीण भागातील लसीकरण केंद्रांवर हक्क सांगत असल्यामुळे आरोग्य विभाग आणि स्थानिक नागरिकांमध्ये संघर्ष होत आहे.
चौकट दररोज जिल्ह्याला किती डाेस मिळतात : १५ ते २५ हजार