ऊसदरप्रश्नी जयंतरावांचे मौन, राजू शेट्टी शांतच...

By Admin | Updated: December 22, 2014 00:17 IST2014-12-22T00:15:53+5:302014-12-22T00:17:23+5:30

शेतकऱ्यांना चिंता : राजारामबापू साखर कारखान्याच्या ऊस दराकडे जिल्ह्याचे लक्ष

The question of Jayantrao's silence, Raju Shetty is calm ... | ऊसदरप्रश्नी जयंतरावांचे मौन, राजू शेट्टी शांतच...

ऊसदरप्रश्नी जयंतरावांचे मौन, राजू शेट्टी शांतच...

अशोक पाटील / इस्लामपूर
गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी पहिला हप्ता कमाल ३५०० व किमान २६०० रुपये देण्याचा प्रस्ताव मांडला आहे. त्यावर पश्चिम महाराष्ट्रातील साखरसम्राटांचे नेते जयंत पाटील यांनी ऊस उत्पादकाला किमान ३ हजार रुपये दर मिळाला पाहिजे, अशी भावना व्यक्त केली होती. तरीसुध्दा राज्यातील साखरसम्राटांनी ताकदीप्रमाणे १७०० ते २६०० रुपयांपर्यंत दर जाहीर केले आहेत. याचा ऊस उत्पादकाला टनामागे ७०० ते ८०० रुपयांचा फटका बसत आहे. यावर जयंत पाटील यांनी मौन पाळले असून, खा. राजू शेट्टीही दिल्लीतच ठाण मांडून आहेत.
आघाडी काँग्रेसच्या काळात गत गळीत हंगामापूर्वीच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांनी ऊस दरासाठी थेट बारामती व कऱ्हाड येथे आंदोलन केले होते. हे आंदोलन मोडून काढण्यासाठी जयंत पाटील यांनी ताकद पणाला लावली होती. परंतु कोल्हापूर जिल्ह्यातील सदाशिवराव मंडलिक यांनी या आंदोलनाची कोंडी फोडली होती. याचा परिणाम हातकणंगले मतदारसंघातील निवडणुकीवर झाला. ऊस उत्पादकांनी शेट्टींना ताकद दिली. यामागे काँग्रेस नेत्यांचाही हात होता.
केंद्रात व राज्यातही भाजपचे सरकार स्थापन झाले. त्यामुळे शेट्टी ऊस उत्पादकांना न्याय देतील, अशीच भावना शेतकरी व्यक्त करत होते. परंतु गळीत हंगाम सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी लोटला, तरी अद्याप दराबाबत कोणीही बोलण्यास तयार नाही. जयंत पाटील यांनीही मौन पाळले आहे. त्यातच राजू शेट्टीही दिल्लीत जाऊन बसले आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांशी कारखान्यांनी दर जाहीर केले आहेत. तेही एफआरपीपेक्षा कमी आहेत. यावर कोणताही शेतकरी संघटनेचा नेता बोलण्यास तयार नाही.
सध्या जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राजारामबापू सहकारी साखर कारखान्यासह इतर तीन युनिट कार्यरत आहेत. येथे मोठ्याप्रमाणात उसाचे गाळप सुरू आहे. परंतु कोल्हापूर जिल्ह्यातील काही कारखान्यांनी २५०० ते २६०० रुपये दर जाहीर केले आहेत. सांगली जिल्ह्यातील काही कारखान्यांनी १९०० रुपये दर दिला आहे. त्यामुळे जयंतराव त्यांच्या कारखान्याचा किती दर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
२५०० रुपये एफआरपी निश्चित झालेली आहे. त्यामुळे राज्यातील सर्वच साखर कारखान्यांनी २५०० व त्याच्या वर दर देणे बंधनकारक आहे. जे दर देणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. कारवाई न झाल्यास सांगलीत मोर्चा काढणार आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी साखरसम्राटांची हुकूमशाही मोडून काढली पाहिजे.
- सदाभाऊ खोत, प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना.
जयंत पाटील दरासंबंधी काहीच बोलत नाहीत. परंतु त्यांच्या कारखान्यांनी २५०० च्या पुढे दर दिला पाहिजे. शेतकरी संघटनेची ताकद काँग्रेसच्या जिवावर आहे. त्यांना आंदोलनावेळी सर्वच पक्षांनी मदत केली आहे. यावेळी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून शेतकऱ्यांचे नेते अज्ञातवासात गेले आहेत. गतवर्षी बारामती, इंदापूर, कऱ्हाड येथे ठिय्या मांडला होता. आता त्यांना मुख्यमंत्र्यांचे नागपूर आणि सहकारमंत्र्यांचे कोल्हापूर का दिसत नाही.
- जितेंद्र पाटील, माजी जि. प. सदस्य, काँग्रेस.

Web Title: The question of Jayantrao's silence, Raju Shetty is calm ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.