तासगाव आगाराच्या कारभाराचा फलकावर पंचनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:42 IST2020-12-12T04:42:58+5:302020-12-12T04:42:58+5:30
तासगाव : तासगाव आगारातील काही अधिकाऱ्यांकडून मनमानी करून चालक, वाहकांना त्रास दिला जात आहे. आगाराचेही आर्थिक नुकसान झाले आहे. ...

तासगाव आगाराच्या कारभाराचा फलकावर पंचनामा
तासगाव : तासगाव आगारातील काही अधिकाऱ्यांकडून मनमानी करून चालक, वाहकांना त्रास दिला जात आहे. आगाराचेही आर्थिक नुकसान झाले आहे. या कारभाराबाबत एसटी कामगार सेनेकडून बसस्थानकातील फलकावर रोज एक समस्या लिहून चुकीच्या कारभाराचा पंचनामा केला जात आहे. दोषी असणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत उपमहाव्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले आहे.
एसटी महामंडळाच्या तासगाव आगारात चालक, वाहकांचा विचार न करता, आगाराच्या फायद्याचा विचार न करता चुकीच्या पध्दतीने कारभार सुरू आहे. विभाग नियंत्रकांच्या पत्राची दखल न घेता, कामगारांच्या ज्येष्ठतेप्रमाणे कामगिरी न देता चुकीचे शेरे मारण्यात आले आहेत. वाहतूक निरीक्षकांनी चुकीच्या पध्दतीने शेरे नोंद करून, चुकीचे कामकाज चालवून महामंडळाचे नुकसान केले आहे. १४ कर्मचाऱ्यांना चुकीचे शेरे मारून महामंडळाचे ३३ हजार ९०२ रुपयांचे नुकसान केले आहे.
महामंडळाचे आर्थिक नुकसान करण्याबरोबरच तासगाव आगारातील अधिकाऱ्यांकडून सुरू असणाऱ्या मनमानी कारभाराबाबत महाराष्ट एसटी कामगार सेनेकडून फलकावर रोज एक समस्या मांडून कारभाराचा पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. अधिकाऱ्यांच्या मनमानीविरोधात कामगार सेनेकडून उपमहाव्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले असून, कारवाई करण्याची माणगी केली आहे.
फोटो : ११ तासगाव १
ओळ : एसटी कामगार सेनेकडून तासगाव बसस्थानकातील फलकावर रोज एक समस्या मांडून अधिकाऱ्यांच्या मनमानीचा पंचनामा करण्यात येत आहे.