पलूस-कडेगावची पोटनिवडणूक ताकदीने लढविणार : पृथ्वीराज देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 06:18 PM2018-05-10T18:18:34+5:302018-05-10T18:18:34+5:30

Pulus-Kejgaon byelection will be fought with strength: Prithviraj Deshmukh | पलूस-कडेगावची पोटनिवडणूक ताकदीने लढविणार : पृथ्वीराज देशमुख

पलूस-कडेगावची पोटनिवडणूक ताकदीने लढविणार : पृथ्वीराज देशमुख

Next
ठळक मुद्देसंग्रामसिंह देशमुख यांचा उमेदवारी अर्ज दाखल

कडेगाव : राज्यातील अनेक पोटनिवडणुकांमध्ये बिनविरोध करण्याचे संकेत काँग्रेसने पाळलेले नाहीत. त्यामुळे आता पलूस-कडेगाव विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणूक बिनविरोध न करता ताकदीने लढविण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे, असे प्रतिपादन भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी केले.

पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांचा भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज दाखल करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार संजय पाटील, आमदार शिवाजीराव नाईक,आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार विलासराव जगताप, माजी मंत्री अजितराव घोरपडे, अतुल भोसले, राजाराम गरुड उपस्थित होते.

पृथ्वीराज देशमुख पुढे म्हणाले, ही निवडणूक ताकतीने लढवायची असून कार्यकर्त्यांनी रात्रीचा दिवस करून प्रचार करावा. पलूस-कडेगाव मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या प्रचारात भाजपची जिल्ह्यातील अखंड टीम सक्रिय होणार आहे. मतदारसंघातील प्रत्येक जिल्हा परिषदेच्या गटात एक मंत्री प्रचार सभा घेणार आहे, असे त्यांनी सांगितले.

संजय पाटील म्हणाले, संग्रामसिंह देशमुख यांना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी संधी मिळाली आणि त्यांनी पारदर्शक व कुशल कारभारातून आपली क्षमता सिद्ध केली आहे. त्यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. आता ताकदीने व जिद्दीने निवडणूक लढवून विजय खेचून आणण्याचा निश्चय भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी केला आहे.
संग्रामसिंह देशमुख म्हणाले, सर्वसामान्य जनता आणि भाजपने मला जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी दिली. या संधीचे सोने करीत जिल्हा परिषदेचा कारभार पारदर्शक व आदर्शवत केला. आता विधानसभा निवडणुकीत भाजपचे कार्यकर्ते जिवाचे रान करतील. कार्यकर्त्यांवर आमचा भरोसा आहे. आमचे कार्यकर्ते रात्रीचा दिवस करतील, पण भाजपचा आमदार करतील.

शिवाजीराव नाईक म्हणाले, संग्रामसिंह देशमुख यांची कार्यकुशलता राज्यस्तरावरील नेत्यांच्या डोळ्यात भरली. त्यामुळे त्यांना उमेदवारी देण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. आता तुम्ही फक्त अर्ज भरा, बाकी सर्व जबाबदारी नेते आणि कार्यकर्ते सांभाळतील.

यावेळी माजी मंत्री अजितराव घोरपडे, आमदार विलासराव जगताप, गोपीचंद पडळकर, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजाराम गरुड यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी आटपाडी पंचायत समितीचे सभापती हर्षवर्धन देशमुख, भाजपचे तालुकाध्यक्ष हिम्मतराव देशमुख, धनंजय देशमुख आदींसह जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी, नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी आमदार सुधीर गाडगीळ ,विक्रम पाटील,माजी आमदार भगवानराव साळुंखे ,भाजप नेते अतुल भोसले यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी मकरंद देशपांडे,पक्ष निरीक्षक रवी अनासपुरे ,प्रसाद पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.सूत्रसंचालन विनायक गायकवाड यांनी केले.
 

 

 

Web Title: Pulus-Kejgaon byelection will be fought with strength: Prithviraj Deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.