शंभर एकर द्राक्षबागांवर किडींचा प्रादुर्भाव
By Admin | Updated: November 12, 2014 23:28 IST2014-11-12T22:15:50+5:302014-11-12T23:28:13+5:30
ढगाळ हवामानाचा परिणाम : दावण्याच्या फैलावामुळे शेतकरी चिंतेत

शंभर एकर द्राक्षबागांवर किडींचा प्रादुर्भाव
दरीबडची : ढगाळ हवामान, रिमझिम पाऊस, धुके, दव यामुळे जत पूर्व भागातील द्राक्षबागांवर दावण्या, स्ट्रिप्स आदी रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या रिमझिम पावसामुळे दावण्याच्या प्रभावाने फ्लॉवरिंगमध्ये असलेल्या बागांचे मणी गळणे, कुजणे, फुलोरा झडणे यासारख्या गंभीर समस्यांना बागांना सामोरे जावे लागत आहे. मुचंडी, सिध्दनाथ परिसरातील १०० एकर बागांवर परिणाम झाला आहे. पावसामुळे द्राक्षबागांच्या औषधांचा खर्च दुप्पट झाल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे.
पूर्व भागामध्ये सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात व आॅक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतर छाटणी घेतलेल्या बागांना दीपावलीवेळी पडलेल्या रिमझिम पावसाचा मोठा फटका बसला आहे. अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे २४ ते २७ आॅक्टोबरपर्यंत रिमझिम पाऊस व ढगाळ हवामानामुळे बागांवर परिणाम झाला आहे. सिध्दनाथ, जालिहाळ खुर्द, दरीकोणूर, मुचंडी, शेड्याळ, आसंगी तुर्क, संख, भिवर्गी, तिकोंडी भागातील ज्यांच्या बागा फ्लॉवरिंग स्टेजमध्ये होत्या, अशा बागांवर परिणाम झाला आहे.
औषध फवारणी करण्यासाठी दोन दिवस वेळ दिला नाही. सारख्या पावसाच्या सरी कोसळत होत्या. औषध फवारणी करता आली नाही. द्राक्ष घडांमध्ये पाणी साचून राहिल्यामुळे मणी गळणे, कुजणे, फुलोरा झडणे आदी गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. द्राक्षघडांची वाढ खुंटली आहे. घड विरघळले आहेत. द्राक्षघड कमी झाले आहेत. याचा मोठा फटका बसला आहे. दावण्या रोखण्यासाठी त्यावेळी दिवसातून एक-दोनवेळा औषध फवारणी केली आहे. त्यामुळे वातावरण ढगाळ आणि द्राक्षोत्पादक घायाळ, असे चित्र निर्माण झाले आहे.
दावण्या रोगाचा प्रादुर्भाव घडांवर व डोळ्याच्या ठिकाणी दिसून येऊ लागला आहे. द्राक्षबागांवरील दावण्या, भुरी, स्ट्रिप्स रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी द्राक्षबागायतदारांनी औषध खरेदीसाठी कृषी सेवा केंद्रांवर गर्दी केली आहे. बागांवर महागड्या औषधांच्या फवारणीचा सपाटा सुरू केला आहे. अॅक्रोबॅट अलेट, मिलेडो कर्जटकोसाईट ही औषधे फवारली जात आहेत. (वार्ताहर)
रिमझिम पावसामुळे द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले आहे. नैसर्गिक संकटांमुळे मणी गळाल्यामुळे घडांची संख्या कमी झाली आहे. वाढही खुंटली आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादनात घट होणार आहे. याचा मोठा फटका बसणार आहे.
- मारुती पाटील,
द्राक्ष उत्पादक शेतकरी