प्रियदर्शनी जागुष्टेची आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप
By Admin | Updated: January 2, 2015 00:20 IST2015-01-01T23:24:58+5:302015-01-02T00:20:23+5:30
रत्नागिरीची कन्या : खुल्या स्पर्धेत दोन सुवर्ण, एक रौप्यपदक

प्रियदर्शनी जागुष्टेची आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप
रत्नागिरी : टाटानगर (झारखंड) येथे नुकत्याच झालेल्या ‘खुल्या आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग, बेंचप्रेस व डेडलिफ्ट अजिंक्यपद स्पर्धेत प्रियदर्शनी जागुष्टे हिने दोन सुवर्ण व एक रौप्य अशा तीन पदकांची कमाई केली.
यापूर्वी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी तिला तीन वेळा मिळाली होती. सन २००९च्या कॉमन वेल्थ पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत तिने भारताला सुवर्ण व स्ट्राँग गर्ल आॅफ कॉमन वेल्थ हा किताब मिळवून दिला आहे. २०११च्या एशियन पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत तिने ३ सुवर्णपदके मिळवून उच्चांक केला. आता नुकत्याच झालेल्या खुल्या गटाच्या आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग, बेंचप्रेस, डेडलिफ्ट स्पर्धेत तिने दोन सुवर्ण व एक रौप्य पदक भारताला मिळवून दिले.
या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी वैशाली कानिटकर यांच्या माध्यमातून मदतीचे अनेक हात पुढे आले. आपल्याला या स्पर्धेत जायचे होते. मात्र मदतीची अपेक्षा होती. यासाठी वैशाली कानिटकर यांनी खूपच मदत केली. केवळ त्यांच्यामुळेच प्रियदर्शनी ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळू शकली. त्यामुळे ही पदके त्यांना अर्पण करीत असल्याचे प्रियदर्शनी जागुष्टे हिने स्पर्धेनंतर बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)
यापूर्वी राष्ट्रीय सिनीयर, ज्युनिअर पॉवरलिफ्टिंग स्पर्धांतून सलग २ वर्षे स्ट्राँग वुमन हा किताब पटकावणारी रत्नागिरी जिल्ह्यातीलच नव्हे; महाराष्ट्रातील एकमेव मुलगी आहे. एशियन स्पर्धेत ४ सुवर्ण, तर कॉमन वेल्थमध्ये ४ सुवर्ण व स्ट्राँग गर्ल आॅफ कॉमन वेल्थ हा किताबही या गुणी खेळाडूने मिळवला आहे. सर्व स्तरातून तिच्या या उत्तुंग यशाबद्दल कौतुक होत आहे.