खासगी डॉक्टरांनी जबाबदारी टाळू नये : माणिक सांगळे
By Admin | Updated: October 6, 2015 23:41 IST2015-10-06T23:04:04+5:302015-10-06T23:41:03+5:30
शहरी व ग्रामीण भागात स्वाइन फ्लूचे रुग्ण सापडत असताना, आरोग्य यंत्रणा काय करीत आहे. लोकांनी काय काळजी घ्यावी, यासाठी कशाप्रकारे प्रबोधन मोहीम हाती घेण्यात आली आहे, या पार्श्वभूमीवर

खासगी डॉक्टरांनी जबाबदारी टाळू नये : माणिक सांगळे
गेल्या महिन्याभरात सांगली, मिरजेसह जिल्ह्यात ‘स्वाइन फ्लू’चा वेगाने फैलाव झाला आहे. महापालिका क्षेत्रात गेल्या पंधरा दिवसांत दहा रुग्णांचा बळी गेला आहे. शासकीय रुग्णालयापेक्षा खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या स्वाइन फ्लू संशयित रुग्णांची संख्या मोठी आहे. शेवटच्या क्षणी खासगी डॉक्टर रुग्णांना शासकीय रुग्णालयात जाण्याचा सल्ला देत आहेत. पण या रुग्णांचा तास-दोन तासात मृत्यू होत आहे. शहरी व ग्रामीण भागात स्वाइन फ्लूचे रुग्ण सापडत असताना, आरोग्य यंत्रणा काय करीत आहे. लोकांनी काय काळजी घ्यावी, यासाठी कशाप्रकारे प्रबोधन मोहीम हाती घेण्यात आली आहे, या पार्श्वभूमीवर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माणिक सांगळे यांच्याशी साधलेला संवाद...
खासगी डॉक्टरांनी काय करावे?
- स्वाइन फ्लू जिल्ह्यात गतीने पसरला आहे. तो शक्तिशाली झाला आहे. अजूनही अनेक रुग्ण शासकीय रुग्णालय म्हटलं की, वेगळाच विचार करतात. यातून ते खासगी रुग्णालयाची वाट धरतात. कोणी कुठे उपचार घ्यावे, यावर बंधन नाही. पण खासगी डॉक्टरांनीही स्वाइन संशयित रुग्ण दाखल झाला की, त्याच्यावर काळजीपूर्वक उपचार करावेत. विशेषत: रुग्णालयात व्हेंटीलेटरची सोय असेल, तरच रुग्णांना दाखल करुन घ्यावे. यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करावा. दोन-चार दिवस उपचार करुनही रुग्ण बरा होत नसेल, तर त्या रुग्णास शासकीय रुग्णालयात पाठवावे किंवा त्याची स्वाइनबाबत तपासणी करुन घ्यावी. असे न करता काही डॉक्टर परिस्थिती हाताबाहेर गेली की, शासकीय रुग्णालयात पाठवित आहेत. महिन्यात अशा सात ते आठ रुग्णांचा तासा-दोन तासात मृत्यू झाला आहे. त्यामुळे खासगी डॉक्टरांनी स्वाइनच्या रुग्णावर उपचार करताना जबाबदारी टाळू नये.
कुठे, कुठे उपचाराची सोय आहे?
- सांगली, मिरजेतील शासकीय रुग्णालयासह ज्या रुग्णालयात व्हेंटीलेटरची सोय आहे, तिथे स्वाइनच्या रुग्णांवर उपचार होऊ शकतात. खासगी डॉक्टरांनी रुग्णाचा स्वाइनबाबत संशय आला, तर त्यांनी सर्व प्रकारची मदत आम्हाला मागितली पाहिजे. आम्ही त्यांना मदत देण्यास तयार आहोत. उदाहरणार्थ टॅमी फ्लू गोळ्या व लस. पण हे डॉक्टर त्यांच्याकडे दाखल असलेल्या रुग्णांची माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहेत. शेवटच्याक्षणी आपल्यावर काही बालंट येऊ नये, यासाठी ते अशा रुग्णांना आमच्याकडे पाठवित आहेत.
लोकांनी काय काळजी घ्यावी?
- ताप, बारीक खोकला व घसा दुखत असेल, तर लोकांनी हे दुखणं अंगावर काढू नये. तातडीने औषधोपचार घ्यावेत. दोन दिवसांत फरक न पडल्यास आपल्यास स्वाइनची लागण झाली आहे, अशी शंका घेण्यास हरकत नाही. अतिताप व तीव्र घसा दुखत असेल तर, कोणताही हलगर्जीपणा करू नये, तातडीने स्वाइन फ्लूची तपासणी करून औषधोपचार घ्यावेत. स्वाइन बरा होऊ शकतो. गर्दीत जाणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे, रोज पालेभाज्या खाव्यात, शिंकताना, खोकताना रूमाल वापरावा. स्वाईन बरा होऊ शकतो, पण तो शरीरात ताकदीने वाढू नये, याची काळजी घेण्याची गरज आहे.
औषधे, जनजागृतीचे काय?
- औषध साठा मुबलक आहे. ग्रामीण रुग्णालयासह महापालिकेच्या रुग्णालयातही औषधांचा पुरवठा केला आहे. लोकांनी काय काळजी घ्यावी, याविषयी गर्दीच्या ठिकाणी फलक लावले आहेत. शहरी व ग्रामीण भागात जिथे स्वाइन फ्लूचा रुग्ण आढळतो, त्या परिसरातील २५ ते ३० घरी जाऊन सर्वेक्षण केले जात आहे. यामध्ये गेल्या आठवड्याभरात कोणी आजारी आहे का, याची तपासणी केली जात आहे. आजारी आढळला तर त्यांना टॅमी फ्लूच्या गोळ्या दिल्या जात आहेत.
विशेषत: कोणी काळजी घ्यावी?
- गरोदर माता, मधुमेह रुग्णांनी तसेच पाच वर्षाच्या आतील लहान मुलांनी (ज्यांची रोगप्रतिकारकशक्ती कमी आहे) काळजी घेतली पाहिजे. यासाठी सर्वांनी स्वाइन फ्लूची लस टोचून घेतली पाहिजे, असा आमचा आग्रह आहे. ही लस सांगली, मिरजेतील शासकीय रुग्णालयासह, महापालिकेच्या रुग्णालयात उपलब्ध आहे.
वर्षभरातील स्थिती काय आहे?
- गेल्या वर्षभरात स्वाइन फ्लू संशयित २०३ रुग्ण आढळून आले होते. त्यांच्या रक्त तपासणीत ६३ रुग्णांना स्वाइनची लागण झाली होती. यापैकी २१ रुग्ण उपचार सुरू असताना मरण पावले आहेत. ४२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या स्वाइन फ्लूची लागण झालेले केवळ तीनच रुग्ण उपचार घेत आहेत.
स्वाइनच्या रुग्णांना शासकीय मदत मिळते का?
- रुग्णांना शासकीय मदत देण्याचा आदेश शासनाने मार्च २०१५ पासून लागू केला आहे. पिवळी व केशरी शिधापत्रिका असलेल्या रुग्णांनाच याचा लाभ मिळू शकतो. ज्या रुग्णांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले, तेथील केवळ व्हेंटिलेटरचा खर्च देण्याची तरतूद आहे. आतापर्यंत केवळ चार रुग्णांनी मदतीसाठी प्रस्ताव दिला आहे. एका रुग्णाचा व्हेंटिलेटरचा किमान खर्च ३० हजार रुपये आहे.
४सचिन लाड ४