सांगली : काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी मंगळवारी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. सोबतच पक्षाच्या सदस्यत्वाचाही राजीनामा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना पाठवला. दरम्यान, पृथ्वीराज पाटील हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये आज, बुधवारी मुंबईत भाजप पक्षात प्रवेश करणार आहेत.पृथ्वीराज पाटील यांच्या भाजप प्रवेशावर सोमवारी रात्री शिक्कामोर्तब झाले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी त्यांच्या घरी स्नेहभोजन केले. त्याचवेळी भविष्यातील योजना आणि संधींबाबत चर्चा झाली. त्याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी ‘सांगली फर्स्ट’ याबाबत त्यांनी आपली मते मांडली होती. त्याला बळ देण्याची ग्वाही त्यांनी दिल्यानंतर प्रवेश निश्चित झाला असून, बुधवारी दुपारी तीन वाजता मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या हस्तेच त्यांचा पक्षप्रवेश होत आहे. त्यासाठी आज काही कार्यकर्ते रवाना झाले. उद्या सकाळी लवकर काही कार्यकर्ते मुंबईला जाणार आहेत.त्याआधी पाटील यांनी काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. २०१४ मध्ये त्यांच्यावर ही जबाबदारी काँग्रेसने सोपवण्यात आली होती.
सांगली शहराच्या हिताला प्राधान्य : पृथ्वीराज पाटीलपृथ्वीराज पाटील म्हणाले, मी काल काँग्रेसमध्ये होतो, उद्या भाजपमध्ये असेन, मात्र माझ्यासाठी सांगलीचे हित हे सर्वप्रथम असेल. काँग्रेसने मला अनेक संधी दिल्या, साथ दिली. मी या पक्षाचा ऋणी आहे. मी राजकारण, समाजकारण काँग्रेसमध्येच शिकलो. विकासाला गती देण्यासाठी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात मला त्यात यश येईल, असा विश्वास आहे. ज्यांनी मला आजवर साथ दिली, त्यांना मी कधीच अंतर देणार नाही. माझ्या खांद्याला खांदा लावून लढणारे कार्यकर्ते ही माझी ताकद आहेत. काही लोक माझ्यासोबत येऊ शकणार नाहीत, मात्र विकासाच्या प्रक्रियेत मी त्यांच्या पाठीशी उभा असेल.