सांगली : काँग्रेस पक्षाने आमच्यावर अन्याय केला आहे असं जिल्हा बँक उपाध्यक्षा जयश्री पाटील यांनी म्हटले आहे. ते पूर्णता चुकीचे आहे. त्यांच्या कुटुंबानी मंत्री, खासदार, आमदार ही पदे भूषवली. आम्हालाही आमदार, मंत्री व्हावे वाटते, असा टोला काँग्रेसचे शहर अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी जयश्रीताई पाटील यांना लगावला. तसेच वसंतदादा बँकेच्या घोटाळ्यातून वाचण्यासाठीच जयश्रीताई यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे, असा आरोपही पाटील यांनी केला.पृथ्वीराज पाटील म्हणाले, जयश्रीताई यांचा भाजपा प्रवेश का झाला? याचा खुलासा खुद्द पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीच पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात केला आहे. वसंतदादा बॅँकेच्या जोखडातून मुक्त करण्यासाठीच हा प्रवेश झाला असल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे यावर अधिक भाष्य करण्याची गरज नाही. स्वत: जोखडातून मुक्त होताना सामान्यांनी ज्या संस्थांनी विश्वासाने बॅँकेत ठेवी ठेवल्या होत्या, त्यांना ठेवी परत करा. ठेवींची जबाबदारी कोणावर? हे देखील स्पष्ट करावे. नजीकच्या काळात बॅँकेत अडकलेल्या ठेवी संबंधितांना परत मिळाल्यास जयश्रीताईंनी केलेल्या पक्षप्रवेशाचा आनंद सर्वांनाच होईल आणि एका दृष्टीने सामान्यांना न्याय मिळेल. जयश्रीताईंच्या भाजपा प्रवेशामुळे काँग्रेस पक्ष खिळखिळा झाला असल्याची चर्चा काहीजण करीत आहेत. परंतु त्यामध्ये तथ्य नाही. त्याचे उत्तर विधानसभेच्या निवडणुकीतच मिळाले आहे. वसंतदादा घराणे त्या निवडणुकीत माझ्याविरोधात मैदानात उतरले होते. परंतु त्या वेळी जयश्रीताईंची अनामत रक्कम देखील जप्त झाली होती हे जनता विसरलेली नाही. सध्या काँग्रेस जरी राज्यात सत्तेत नसली तरी देखील महायुतीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील आमचे अनेक मित्र मंत्रिपदी आहेत. त्या ओळखीचा उपयोग करुन विकासाची कामे करणे हेच माझे धोरण आहे. कोणत्याही परिस्थितीत विकासकामांना खीळ बसता कामा नये, या हेतूने आतापर्यंत अनेक विकासकामे मंजूर करून घेतली आहेत. दोनदा निवडणुकीत पराभव झाला असला तरी भविष्यकाळात सामान्यांच्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी लढत राहणार आहे. आता महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. अद्याप आघाडीचा निर्णय झाला नसला तरी आगामी निवडणुकीत सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा निश्चित फडकेल, असा त्यांनी व्यक्त केला.
माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांवर कारवाईकाँग्रेसचे माजी नगरसेवक किंवा पदाधिकारी भाजपमध्ये गेले असतील तर त्यांच्यावर कारवाईबाबत काँग्रेस नेते आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हा बँक उपाध्यक्षांबाबतही योग्य निर्णय होईलजयश्री पाटील यांना काँग्रेसच्या पक्षाच्या माध्यमातून जिल्हा बँकेचे उपाध्यक्षपद दिले होते. जयश्री पाटील यांनी काँग्रेस पक्ष सोडल्यामुळे त्यांच्याकडे जिल्हा बँक उपाध्यक्ष पद कधी काढायचे ते पक्षाचे नतेच ठरवणार आहेत. काँग्रेसचे जिल्ह्याचे नेते डॉ. विश्वजीत कदम यांच्याशी जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष पदाबाबत चर्चा करणार आहे. त्यांच्याकडून जो निर्णय येईल, तो आम्हाला मान्य असणार आहे, असेही पृथ्वीराज पाटील यांनी स्पष्ट केले.