ताडाचीवाडीत प्राथमिक शिक्षकावर खुनी हल्ला
By Admin | Updated: September 3, 2014 00:05 IST2014-09-03T00:05:13+5:302014-09-03T00:05:13+5:30
गंभीर जखमी : संशयितास अटक

ताडाचीवाडीत प्राथमिक शिक्षकावर खुनी हल्ला
विटा / खानापूर : ताडाचीवाडी (ता. खानापूर) येथे प्राथमिक शिक्षकावर शाळेतच कुऱ्हाडीने तीन वार करून खुनी हल्ला करण्यात आला. ही घटना आज, मंगळवारी सकाळी पावणेबाराच्या सुमारास घडली. असिफ युनूस शेख (वय २५, मूळगाव केज, ता. बीड, सध्या रा. ताडाचीवाडी) असे हल्ल्यात जखमी झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी हल्लेखोर संजय आनंदराव पवार (३७, रा. ताडाचीवाडी) यास विटा पोलिसांनी अटक केली आहे. हल्ल्याचे नेमके कारण रात्री उशिरापर्यंत समजू शकले नाही. शिक्षकावर शाळेतच झालेल्या हल्ल्याचे तीव्र पडसाद तालुक्यात उमटले असून, शिक्षक संघटनांनी पोलीस उपअधीक्षक डॉ. अभिजित पाटील यांची भेट घेऊन संबंधितावर तातडीने कारवाई करावी, या मागणीचे निवेदन दिले. ताडाचीवाडी येथील प्राथमिक शाळेत गेल्या सात वर्षांपासून असिफ शेख शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. आज सकाळी पावणेबाराच्या सुमारास हल्लेखोर संजय पवार शाळेत अचानक घुसला. त्यावेळी त्याने धारधार कुऱ्हाड पाठीमागे लपवून आणली होती. शाळेत आल्यानंतर पवारने शेख यांच्यावर हल्ला चढविला. कुऱ्हाडीचा पहिला वार डोक्यात बसत असताना तो चुकविल्याने मानेवर लागला. त्यानंतर हल्लेखोराने दुसरा वार डोक्यात व तिसरा वार हातावर केला. मुलांचा शाळा सोडल्याचा दाखला घेण्यासाठी आलेले भास्कर पवार व सहशिक्षक बोडरे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून हल्लेखोरास पकडले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. त्यानंतर भास्कर पवार व सहशिक्षकांनी या घटनेची माहिती पोलिसांना कळविली. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर हल्लेखोर संजय पवार यास पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. जखमी शिक्षक शेख यांना तातडीने करंजे ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तासगाव येथे हलविण्यात आले. शेख यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे नेमके कारण रात्री उशिरापर्यंत समजू शकले नसले, तरी हल्लेखोर मनोरुग्ण असल्याची शक्यता पोलीस निरीक्षक अनिल पोवार यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. या घटनेनंतर शिक्षक संघटनांनी एकत्रित येऊन पोलीस उपअधीक्षक डॉ. पाटील यांना निवेदन दिले. (वार्ताहर)