इस्लामपूर : राजर्षी शाहू महाराज यांनी समाजाला मानवी समानतेचे अधिष्ठान दिले. ते सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ होते. शिक्षण, सहकार, कला, क्रीडा क्षेत्रातील त्यांचे योगदान मोठे आहे. छत्रपती शाहू द्रष्टे राजे व कर्ते सुधारक होते. त्यांचा वैचारिक वारसा जपला पाहिजे, असे मत इतिहास अभ्यास माजी प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र अंनिसच्या जिल्हा शाखेच्या वतीने आयोजित शाहू महाराज जयंतीच्या ऑनलाइन कार्यक्रमात ते बोलत होते. अॅड. के. डी. शिंदे अध्यक्षस्थानी होते. शिंदे म्हणाले, शाहू महाराज यांनी आपल्या संस्थांना अनेक सामाजिक कायदे केले. सामान्य, पददलित, वंचित घटकांना न्याय देण्याचा यशस्वी प्रयत्न केला. त्यांनी आपले आयुष्य सत्ता, संपत्ती, सामान्य जनतेचे राहणीमान उंचावण्यासाठी खर्ची घातले. ते रयतेची काळजी घेणारे लोकराजा होते.
डॉ. सुनील पाटील यांनी स्वागत केले. एन. डी. पिसे यांनी प्रास्ताविक केले. नीलेश कुडाळकर यांनी परिचय करून दिला. अजय भालकर यांनी सूत्रसंचालन केले. खंडू घोडे यांनी आभार मानले. यावेळी अंनिसचे राज्य प्रधान सचिव संजय बनसोडे, उपाध्यक्ष प्रा. श्यामराव पाटील, प्रा. डॉ. नितीन शिंदे, चंद्रकांत वनजाळे, प्रा. एकनाथ पाटील, प्रा. बी. आर. जाधव उपस्थित होते.