प्रतापसिंह उद्यानाचे भाग्य उजळले!

By Admin | Updated: August 12, 2014 23:15 IST2014-08-12T22:52:23+5:302014-08-12T23:15:52+5:30

सुशोभिकरणास मान्यता : विश्रामबाग चौकात होणार स्कायवॉक

Pratapsingh garden festivities! | प्रतापसिंह उद्यानाचे भाग्य उजळले!

प्रतापसिंह उद्यानाचे भाग्य उजळले!

सांगली : सांगलीतील प्रतापसिंह उद्यानाचे रूपडे लवकरच बदलणार आहे. उद्यानाच्या सुशोभिकरणासाठी एक कोटी रुपयांची निविदा आज (मंगळवारी) स्थायी समिती सभेत मंजूर करण्यात आली. कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरी मठाच्या धर्तीवर या उद्यानाचे सुशोभिकरण केले जाणार आहे. याशिवाय विश्रामबाग चौकात दीड कोटी रुपये खर्चून स्कायवॉक उभारण्यासही मान्यता देण्यात आली.
स्थायी समितीचे सभापती राजेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत सुमारे अडीच कोटी रुपयांच्या कामांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. सांगलीतील एकेकाळचे सर्वात आकर्षणाचे केंद्र म्हणून प्रतापसिंह उद्यानाकडे पाहिले जात होते. याठिकाणचे प्राणीसंग्रहालयही बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांसाठी कुतूहलाचा विषय होता. तत्कालीन पदाधिकारी व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे प्राणीसंग्रहालय बंद पडले व उद्यानाचीही दुरवस्था झाली. यावर ‘लोकमत’ने प्रकाशझोत टाकला होता. त्यानंतर पालिकेतील सत्ताधारी काँग्रेसने उद्यानाच्या सुशोभिकरणाचा निर्णय घेतला.
आजच्या सभेत ९९ लाख ४५ हजार रुपयांची निविदा मंजूर करण्यात आली. कोल्हापुरातील कणेरी मठाच्या धर्तीवर या उद्यानाचे सुशोभिकरण केले जाणार असून, उद्यानात खेळणी, मिनी थिएटर, संग्रहालय अशा विविध बाबींचा समावेश करण्यात आला आहे.
विश्रामबाग चौकात १ कोटी ४२ लाख रुपये खर्चाच्या स्कायवॉकलाही सभेत मान्यता देण्यात आली. या चौकात होणारी वाहतुकीची कोंडी, नागरिकांना रस्ता ओलांडताना होणारा त्रास कमी करण्यासाठी स्कायवॉक उभारला जाणार आहे. चौकाच्या चारही बाजूंनी स्कायवॉकद्वारे रस्ता ओलांडता येईल, असे स्थायी समिती सभापती नाईक यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

महापालिका निवडणुकीत काँग्रेसने जनतेला विकासाचे आश्वासन दिले होते. त्यादृष्टीने पावले उचलली जात आहेत. प्रतापसिंह उद्यान व स्कायवॉकला सभेत मान्यता मिळाली आहे. येत्या आठ दिवसात या कामाचा प्रारंभ करणार आहोत, असे स्थायी समितीचे सभापती राजेश नाईक यांनी सांगितले.

Web Title: Pratapsingh garden festivities!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.