यंत्रमाग उद्योगाची वीज दरवाढ जैसे थे
By Admin | Updated: August 31, 2015 22:08 IST2015-08-31T22:08:28+5:302015-08-31T22:08:28+5:30
ऊर्जामंत्र्यांची घोषणा फोल : दरवाढ मागे घेण्याची यंत्रमाग धारकांना प्रतीक्षा

यंत्रमाग उद्योगाची वीज दरवाढ जैसे थे
विटा : राज्यातील यंत्रमाग लघुउद्योगाचे वीजदर कोणत्याही परिस्थितीत वाढणार नाहीत, जी वाढीव दराने बिले आली असली, तरी यंत्रमागधारकांनी जुन्या दरानेच बिले भरावीत, जुन्या व नव्या दरातील बिलात असलेल्या फरकाच्या रकमेपोटी २०० कोटी रुपये मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करून घेऊन यंत्रमाग लघुउद्योगाच्या वीज दरवाढीचा प्रश्न निकाली काढला जाईल, अशी घोषणा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली असली तरी, यंत्रमाग लघुउद्योगाची वीज दरवाढ अद्यापही जैसे थे अशीच आहे. त्यामुळे ऊर्जामंत्र्यांची ही घोषणा फोल ठरली असून, यंत्रमागधारकांना वीज दरवाढ कधी मागे घेतली जाणार, याची प्रतीक्षा लागली आहे.
राज्य विद्युत नियामक आयोगाने १ जूननंतरच्या वीज दराबाबतचा निर्णय जाहीर करताना यंत्रमाग व्यवसायातील २७ अश्वशक्तीच्या आतील ग्राहकांच्या वीजदरात सर्व करासहीत जवळपास ४५ पैसे प्रतियुनिट दरवाढ केली आहे. त्यावरील ग्राहकांना १५ ते २० पैसे युनिट दरवाढ लागू झाली आहे. अगोदरच इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात वीजदर जास्त असतानाच ही दरवाढ लादली गेल्याने राज्यभरातील यंत्रमागधारकांत प्रचंड नाराजी पसरली होती. यापार्श्वभूमीवर ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मुंबईत यंत्रमाग संघटनेचे प्रतिनिधी, संबंधित लोकप्रतिनिधी, ऊर्जा खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत मंत्री बावनकुळे यांनी जुन्या दरानेच वीज बिले वसूल करावीत, फरकाची २०० कोटी रुपये रक्कम कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर केली जाईल, असे महावितरणला सांगितले होते, तर यंत्रमागधारकांनाही जुन्या दरानेच वीजबिले भरण्याच्या सूचना केल्या होत्या.
यानुसार इचलकरंजी येथील यंत्रमागधारकांनी वाढीव बिलाची रक्कम कमी करून घेऊन वीज बिले भरली. परंतु, पुढील महिन्याच्या बिलातून कमी झालेली थकित रक्कम व्याजासह पुन्हा आकारून आली आहे. त्यामुळे यंत्रमागधारकांत गोंधळाचे वातावरण पसरले आहे. ऊर्जामंत्री बावनकुळे यांच्या घोषणेनंतरही यंत्रमाग लघुउद्योगाचे वीजदर कमी न झाल्याने ऊर्जामंत्र्यांनी दिलेले आश्वासन व केलेली घोषणा फोल ठरली आहे. त्यामुळे यंत्रमागधारकांना वीजदर वाढ कमी होण्याची प्रतीक्षा लागली आहे. (वार्ताहर)