डाळिंब बागायतदारांना ‘तेल्या’चा फटका

By Admin | Updated: August 21, 2014 00:28 IST2014-08-20T23:43:48+5:302014-08-21T00:28:40+5:30

जिल्ह्यातील स्थिती : पाचशे एकर क्षेत्रावर फैलाव; बागांचे वीस ते पंचवीस कोटींचे नुकसान लोकमत विशेष

Pomegranate growers strike 'Teela' | डाळिंब बागायतदारांना ‘तेल्या’चा फटका

डाळिंब बागायतदारांना ‘तेल्या’चा फटका

अशोक डोंबाळे -सांगली --रिमझिम पाऊस, ढगाळ हवामानामुळे जत, आटपाडी, कवठेमहांकाळ तालुक्यातील पाचशे एकर डाळिंब बागांवर तेल्या (बिब्ब्या)ने हल्ला चढविल्यामुळे पूर्ण बागाच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत़ फळे फुटली असून बागेतील पाने पूर्ण गळून पडल्यामुळे झाडांची वाढही खुंटली आहे़ यामुळे शेतकऱ्यांना वीस ते पंचवीस कोटींचा फटका बसला आहे़ गलेलठ्ठ पगार घेणाऱ्या कृषी विभागातील अधिकाऱ्यांना मात्र तेल्याच्या फैलावाची कोणतीही कल्पना नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे़
२००२ ते २००४ या कालावधित डाळिंब बागांवर तेल्या रोगाने हल्ला करून पूर्ण बागाच उद्ध्वस्त केल्या होत्या़ तेल्या रोग संसर्गजन्य असल्यामुळे एका बागेवर आलेल्या रोगाने महिन्याच्या आत जवळपासच्या सर्व भागांमध्ये शिरकाव करून कोट्यवधीचे नुकसान केले होते़ तेल्याच्या भीतीने हजारो हेक्टरवरील डाळिंब बागा शेतकऱ्यांनी काढून टाकल्या होत्या़ याचे गांभीर्य ओळखून तत्कालिन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केंद्राच्या कृषी विभागाच्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांना सांगोला, जत, आटपाडी तालुक्यातील डाळिंब बागांची पाहणी करून त्यावर कायमस्वरूपी औषध शोधण्याचा सल्ला दिला होता़ त्यानुसार पाहणी झाली, त्यानंतर सोलापूर येथे डाळिंब रोगावर संशोधन करण्यासाठी स्वतंत्र कार्यालयही सुरु झाले़ पण, आजही डाळिंबावर पडणाऱ्या तेल्या रोगाचा बंदोबस्त झालेला दिसत नाही़
जत तालुक्यातील व्हसपेठ, माडग्याळ, गुड्डापूर, दरीबडची, जालिहाळ, सिध्दनाथ आदी परिसरातील शंभर ते दीडशे एकर बागांवर तेल्या (बिब्ब्या) रोगाचा फैलाव वाढला आहे. दरीबडची येथील कामाण्णा पाटील यांनी दिलेली माहिती तर धक्कादायकच आहे़ ते म्हणाले की, दोन वर्षे दुष्काळामुळे डाळिंब बागांचा हंगाम घेता आला नाही़ यावर्षी घेतला, पण तेल्या रोगामुळे पूर्ण बाग उद्ध्वस्त झाली आहे़ फळे फुटली असून लाखो रूपयांचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले़ पाटील यांच्याप्रमाणेच या परिसरातील शेतकरी तेल्या रोगामुळे हतबल झाला आहे़ अनेक शेतकऱ्यांनी डाळिंब बाग लागल्यापासून पहिल्यांदाच पीक घेतले असून तेथे तेल्याने हल्ला चढविला आहे़ यामुळे दोन ते तीन वर्षे केलेली मेहनत आणि लाखो रूपये वाया गेल्याची शेतकऱ्यांची भावना झाली आहे़
कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना मात्र याची कोणतीही कल्पना नाही़ याबद्दल शेतकऱ्यांतून तीव्र नाराजी आहे़ आटपाडी, कवठेमहांकाळ तालुक्यातील डाळिंब बागांवरही तेल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याचे तेथील शेतकऱ्यांनी सांगितले़
जिल्ह्यात ११ ते १२ हजार हेक्टरवर डाळिंब बागांचे क्षेत्र होते़ २००२ च्या दरम्यान जिल्ह्यात तेल्या रोगाने डाळिंब बागांवर हल्ला चढविल्यामुळे शेतकऱ्यांनी पूर्ण बागाच काढून टाकल्या होत्या़ सध्या जिल्ह्यात केवळ सात हजार ४३० हेक्टर डाळिंब बागांचे क्षेत्र आहे़ एक किलो डाळिंबाला शंभर ते सव्वाशे रूपये दर असल्यामुळे शेतकरी डाळिंबाकडे पुन्हा वळला आहे़ परंतु, गेल्या पंधरा दिवसांच्या ढगाळ हवामानामुळे आणि पावसामुळे पुन्हा तेल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे़

डाळिंब बागांमध्ये तेल्या रोगाचा फैलाव वाढल्याबद्दल शेतकऱ्यांच्या तक्रारी नाहीत़ शेतकऱ्यांकडून तक्रारी आल्यास तात्काळ तेथे भेट देऊन कृषी विभागाचे अधिकारी पाहणी करून त्यांना मार्गदर्शन करतील़ योग्य कीटकनाशकांचा वापर केल्यास तेल्या रोगाचा बंदोबस्त करता येऊ शकतो़ कृषी अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानेच कीटकनाशक फवारणी करावी़
-शिरीष जमदाडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
दीड ते दोन लाख रूपये कर्ज काढून दीड एकर क्षेत्रात चारशे डाळिंबाच्या रोपाची लागण केली होती़ यावर्षी पहिलेच पीक घेतले असून पूर्ण बागेवर तेल्या रोगाचा फैलाव झाल्याने बाग उद्ध्वस्त झाली आहे़ लाखो रूपयांचा खर्च वाया गेल्यामुळे कुटुंबियांना धक्का बसला आहे़ याकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे़
-संभाजी लेंगरे, डाळिंब बागायतदार, व्हसपेठ, ता़ जत़

Web Title: Pomegranate growers strike 'Teela'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.