राजकारण, प्रशासनात धर्माचा हस्तक्षेप नको

By Admin | Updated: August 24, 2014 23:17 IST2014-08-24T22:47:18+5:302014-08-24T23:17:12+5:30

हनुमंत उपरे : सांगलीत सेक्युलर मुव्हमेंटचा मेळावा उत्साहात

Politics and administration do not interfere with religion | राजकारण, प्रशासनात धर्माचा हस्तक्षेप नको

राजकारण, प्रशासनात धर्माचा हस्तक्षेप नको

सांगली : राजकीय आणि प्रशासनात नको तितका धर्माचा हस्तक्षेप वाढत चालला असून, त्याला वेळीच पायबंद घालणे आवश्यक आहे. समता, न्याय आणि बंधुता ही तत्त्वे जोपासायची असतील तर प्रत्येकाला सेक्युलर व्हावे लागेल, असे मत सत्यशोधक ओबीसी परिषदेचे अध्यक्ष हनुमंत उपरे यांनी व्यक्त केले.
सेक्युलर मुव्हमेंटच्यावतीने भावे नाट्य मंदिरात आयोजित मेळाव्यात उपरे प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत गौतमीपुत्र कांबळे होते. हनुमंत उपरे म्हणाले, सध्या देशात आर्थिक भ्रष्टाचारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, याला सामाजिक भ्रष्टाचार जबाबदार आहे. अण्णा हजारे हे कधीही सामाजिक भ्रष्टाचाराबाबत बोलत नाहीत. त्यांनी याप्रश्नी आवाज उठविला पाहिजे. आजकाल कोणत्याही शासकीय कार्यालयात गेले असता आपल्याला तेथे देवादिकांची छायाचित्रे दिसतात. शासकीय कार्यालयात देवांची छायाचित्रे लावणे म्हणजे प्रशासकीय कामात धर्माचा हस्तक्षेपच आहे, तर दुसरीकडे राजकारणात धर्माच्या नावावर मते मागितली जातात. हे दोन्ही प्रकार त्वरित थांबले पाहिजेत. देशात पसरत चाललेले सामाजिक प्रदूषण रोखणे आपले प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचेही त्यांनी सांगितले.
गौतमीपुत्र कांबळे म्हणाले, समाजरचनेची व्यवस्थेनुसार आपण वागलो, तर हमखास दुसऱ्यांवर अन्याय होतो. हे टाळण्यासाठी व्यवस्थेमध्ये परिवर्तन आवश्यक आहे. सेक्युलर मुव्हमेंट यामधील सेक्युलर या शब्दाचा अर्थ सर्वधर्मसमभाव असा होत नाही. सेक्युलर म्हणजे धम्म! हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. जगातील सर्वच धर्माचा अभ्यास केला तर त्यामध्ये काही प्रमाणात अनुचित बाबी आहेत. त्या बाबी धर्मातल्या चांगल्या व्यक्तींनी नष्ट केल्या पाहिजेत. सेक्युलर चळवळ ही प्रवाहाच्या विरोधात जाणारी असून, जे सोबत येतील, त्यांना घेऊनच ती पुढे जाईल, असे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी डॉ. भरत नाईक, संग्राम सावंत, आकाश साबळे, प्रसेनजित बनसोडे, मिलिंद वडमारे, जे. व्ही. सरतापे, अंबादास कांबळे, गौतम सांगले, सुभाष दगडे, सुभाष शिलेवंत, कैलास काळे उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Politics and administration do not interfere with religion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.