खत कंपन्यांच्या लिंकिंगला राजकर्ते, अधिकारी जबाबदार - रघुनाथदादा पाटील
By अशोक डोंबाळे | Updated: March 25, 2025 18:17 IST2025-03-25T18:17:19+5:302025-03-25T18:17:49+5:30
नको असलेल्या खताची शेतकऱ्यांना सक्ती

खत कंपन्यांच्या लिंकिंगला राजकर्ते, अधिकारी जबाबदार - रघुनाथदादा पाटील
सांगली : शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. त्यात पुन्हा केंद्र, राज्य सरकार आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादामुळे रासायनिक खत विक्रेत्यांकडून खत लिंकिंग जोरात सुरू आहे. शेतकऱ्यांची गरज नसलेल्या पीजीआर आणि मिश्र खताची सक्ती केली जात आहे. हे उद्योग शासनाने थांबवली नाही तर सरकार आणि खत कंपन्याविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शेतकरी संघटना अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिला.
पाटील म्हणाले, युरिया घेण्यासाठी नको असलेली मिश्र खते शेतकऱ्यांच्या माथी मारून लिंकिंग केले जात आहे. यामध्ये सरकारच सहभागी झाले आहे, याला आमचा विरोध आहे. केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा एकीकडे सांगतात, रासायनिक खताचे लिंकिंग करू नका असे सांगत आहेत. तरीही खत कंपन्या आणि खत विक्रेत्यांकडून लिंकिंग चालूच आहे. जिल्हा परिषद कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रारी करूनही ते दुर्लक्ष करत आहेत. खत कंपन्यांनाच त्यांचे पाठबळ दिसत आहे.
निवडणुकांमध्ये खत कंपन्यांकडून राजकीय पक्षांना देणग्या मिळत असल्यामुळे ते कंपन्यावर कारवाई करू शकत नाहीत. कृषी विभागाचे अधिकारीही त्यामुळेच गप्प आहेत. खत कंपन्यांच्या लिंकिंगविरोधात कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया या संस्थेकडे फर्टिलायझर कंपनीच्या तक्रारी आम्ही केल्या आहेत. तरीही नको असलेली मिश्र खते व इतर खते शेतकऱ्यांच्या माथी मारली जात आहेत. युरियावर सबसिडी मात्र सोबत दिली जाणारी खते महागडी आहेत.
शरद पवार यांच्याकडून दोनवेळा आमदारकीची ऑफर
तत्कालीन एका जिल्हाधिकारी यांच्यामार्फत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी मला भेटण्यासाठी प्रस्ताव दिला होता. आमदारकीचाही प्रस्ताव होता. पण, तो प्रस्ताव मी नाकारला. त्यानंतर माजी खासदार राजू शेट्टी यांना शेतकरी संघटनेतून फोडून खासदार केले होते, असा गौप्यस्फोट रघुथनाथदादा पाटील यांनी सांगलीतील पत्रकार परिषदेत केला.
तसेच मी खासदार, आमदार जनतेतून निवडणूक लढवूनच होणार आहे. पाच विधानसभा आणि चार लोकसभा निवडणुका आतापर्यंत लढलो आहे. मतदारांनी मला स्वीकारले नाही. तरीही शेतकऱ्यांसाठी यापुढेही निवडणुका लढतच राहणार आहे, असेही ते म्हणाले.
खत कंपन्यांकडून 'मॅनेज'साठी प्रयत्न
खत लिंकिंगविरोधात आवाज उठवताच मलाही 'मॅनेज' करण्यासाठी रासायनिक खत कंपन्यांच्या प्रतिनिधींनी प्रयत्न केला. माझ्या नातेवाइकांकडेही कंपनीचे प्रतिनिधी गेले होते. तरीही मी त्यांना मॅनेज झालो नाही. शेतकऱ्यांच्या हितासाठी खत कंपन्यांच्या विरोधात मी आवाज उठविणार आहे, असेही रघुनाथदादा पाटील म्हणाले.