टंचाईच्या झळांवर राजकारणाची पोळी
By Admin | Updated: August 19, 2015 22:27 IST2015-08-19T22:27:44+5:302015-08-19T22:27:44+5:30
तासगावात श्रेयवाद रंगला : भाजप-राष्ट्रवादी, काँग्रेसमध्ये पाण्याआधीच कलगीतुरा

टंचाईच्या झळांवर राजकारणाची पोळी
दत्ता पाटील - तासगाव तालुक्यात पावसाअभावी पाणी टंचाईची भीषणता जाणवत आहे. खरीप हंगाम वाया गेला आहे. बागायती क्षेत्रही धोक्यात आले आहे. पाणी योजनांतून तातडीने पाणी मिळावे, टंचाई जाहीर करुन चारा-पाण्याची सोय व्हावी, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्ष सरसावले आहेत. मात्र टंचाईच्या झळांवर राजकारण आणि श्रेयवादाची पोळी भाजण्यातच अधिक रस असल्याचे दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपच्या कारभाऱ्यांविरोधात विरोधक राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात शाब्दिक कलगीतुरा रंगला आहे.
मान्सूनच्या पावसाने हुलकावणी दिल्यामुळे तालुक्यातील तब्बल ४० हजार हेक्टरवरील खरिपाचा पेरा वाया गेला आहे. कृषी विभागाने त्याबाबतचा अहवालही सादर केला आहे. यंदा पुरेसा पाऊस झाला नसल्याने तालुक्यातील पाणी पातळीही खालावली आहे. त्यामुळे द्राक्ष, उसासह अन्य बागायती पिकांनाही पाणी उपलब्ध करणे अवघड झाले आहे. खरीप वाया गेल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे.
टेंभू, ताकारी, म्हैसाळ, विसापूर-पुणदी या पाणी योजनांचा तालुक्यातील काही गावांना लाभ होतो, तर बहुतांश योजनांचे काम अर्धवट असल्यामुळे काही गावांना या योजनांचा लाभ होत नाही. तरीही या योजनांतून तातडीने पाणी सोडावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. रखडलेल्या पाणी योजनांचे काम पूर्ण व्हावे. खरीप वाया गेल्याने जनावरांना चाऱ्याची सोय व्हावी. टंचाई जाहीर करुन शेतकऱ्यांना कर्ज, वीज बिलात सवलत मिळावी, खरिपाची नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी सर्वच शेतकऱ्यांची आहे.
टंचाईबाबत शेतकरी संवेदनशील झाला आहे. याचा फायदा राजकीय पक्षांनी घेण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसने याच मागण्यांसाठी गुरुवारी, दि. २० रोजी तासगावात चक्का जाम करण्याचा इशारा दिला आहे. तसेच राष्ट्रवादीनेही २४ तारखेला चक्का जाम करण्याचा इशारा दिला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही ‘भीक मांगो’ आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
एकमेकांविरोधात राजकीय ‘फिल्डिंग’
शेतकऱ्यांच्या भावनांच्या लाटेवर स्वार होत विरोधी पक्षांनी आंदोलनाची मेख मारली आहे. सत्तेत असणाऱ्या भाजपचे खासदार संजय पाटील यांनाही टीकेचे लक्ष्य केले आहे. खासदारांनी केवळ राजकारण न करता, वजन वापरुन पाणी आणावे, असा टोला राष्ट्रवादीने लगावला आहे.
भाजपकडूनही राष्ट्रवादीला लक्ष्य केले जात आहे. खासदार संजयकाका पाटील यांच्यामुळे पाणीप्रश्न मार्गी लागणार आहे. मात्र त्याचे श्रेय खासदारांना मिळू नये, राष्ट्रवादीला मिळावे, यासाठीच राष्ट्रवादीकडून आंदोलनाची स्टंटबाजी केली जात असल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. एकूणच तालुक्यातील टंचाईच्या राजकारणावर श्रेयवादाची पोळी भाजण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा विसर पडला आहे. शेतकऱ्यांच्या हितापेक्षा राजकारण करण्यात सत्ताधारी पक्षाचे नेते मश्गुल झाले आहेत. तालुक्यातील शेतकरी पाण्याअभावी देशोधडीला लागण्याची चिन्हे आहेत. शेतीला तातडीने पाणी मिळावे, टंचाई जाहीर व्हावी, यासाठी गुरुवारी चक्का जाम आंदोलन करणार आहे. त्यानंतरही शासनाने दखल घेतली नाही, तर भविष्यात आंदोलन आणखी तीव्र करणार आहे.
- महादेव पाटील, तालुकाध्यक्ष, काँग्रेस
खासदार संजयकाका यांनी पाणी योजना सुरु करण्यासाठी निधीसंदर्भात भाजप आमदारांसह मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. मुख्यमंत्र्यांनी निधी देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे टेंभू, आरफळ योजना चार दिवसात सुरू होतील. तसेच म्हैसाळ योजनेसाठीही पाठपुरावा सुरु असून, ती आठ दिवसात सुुरू होणार आहे. तरीही आम्ही आंदोलन केले म्हणून पाणी आले, असे दाखवून श्रेयवादासाठी आंदोलनाची स्टंटबाजी सुरू आहे.
- जयवंत माळी, पं. स. सदस्य, भाजप.
तालुक्यात पावसाअभावी शेतीची भीषण अवस्था आहे. पाणी योजनांतून सर्व शेतकऱ्यांना लाभ होत नाही. तरीही सद्यस्थिती पाहता, तातडीने पाणी योजनांतून पाणी उपलब्ध करुन देण्याची आवश्यकता आहे. तसेच रखडलेल्या पाणी योजनाही तात्काळ पूर्ण व्हायला हव्यात. टंचाईच्या सुविधाही शासनाने द्याव्यात, त्यासाठी कोण आंदोलन करतो, कोण पाठपुरावा करतो, हे शेतकऱ्यांना महत्त्वाचे नाही. श्रेयवादाच्या पोळीपेक्षा शेतकऱ्यांची झोळी भरणे महत्त्वाचे आहे.
- जोतिराम जाधव, तासगाव तालुका पाणी संघर्ष समिती.
माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्यामुळे तालुक्यात पाणी योजना झालेल्या आहेत. खासदार संजयकाका पाटील सत्ताधारी पक्षाचे आहेत. टंचाई निर्माण झाल्यामुळे त्यांनी शासनाकडे आपले वजन वापरुन पाणी योजना सुरु कराव्यात, अन्यथा शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे शासनाने डोळेझाक केल्यास राष्ट्रवादी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे. यासाठी २४ आॅगस्टला चक्का जाम आंदोलन करणार आहे.
- हणमंतराव देसाई, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी.