राजकीय वारसदारांची होणार रेलचेल

By Admin | Updated: August 19, 2015 22:31 IST2015-08-19T22:31:14+5:302015-08-19T22:31:14+5:30

वाळवा-शिराळ्यात शक्तिप्रदर्शन : यंदा गणेश मंडळांच्या आरतीचे निमंत्रण

Political heirs to be held | राजकीय वारसदारांची होणार रेलचेल

राजकीय वारसदारांची होणार रेलचेल

अशोक पाटील-इस्लामपूर  वाळवा-शिराळा तालुक्यातील सर्वच पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांच्या वारसदारांची आता गणेश मंडळांच्या कार्यक्रमांतून रेलचेल दिसणार आहे. माजी मंत्री आ. जयंत पाटील, आ. शिवाजीराव नाईक, माजी आमदार मानसिंगराव नाईक, माजी आमदार विलासराव शिंदे, दिलीपतात्या पाटील, सी. बी. पाटील, विनायकराव पाटील यांचे राजकीय वारसदार यंदाच्या गणेशोत्सवात गणेश मंडळांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांसह आरतीला हजेरी लावून शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहेत.
मागीलवर्षीच्या गणेशोत्सवात जयंत पाटील यांच्यावर ग्रामविकास मंत्रीपदाची आणि मुंबई येथील पालक मंत्रीपदाची जबाबदारी होती. त्यामुळे त्यांना मतदार संघातील गणेश मंडळांच्या आरतीसाठी उपस्थित राहता आले नाही. त्यामुळे त्यांनी पुत्र प्रतीक व राजवर्धन यांना मतदार संघातील मंडळांच्या कार्यक्रमांना उपस्थित राहण्यास सांगितले होते. यावेळी मात्र जयंत पाटील यांच्याकडे अधिक वेळ आहे. मात्र राजकारणात उतरविण्याच्या दृष्टिकोनातून ते राजवर्धन पाटील यांनाच आरतीसाठी मतदार संघात उपस्थित राहण्यास सांगण्याची शक्यता आहे.
माजी आमदार मानसिंगराव नाईक यांचे पुत्र विराज नाईक राजकारणाच्या उंबरठ्यावर आहेत. त्यांना आरतीला बोलावण्यासाठी आतापासून मंडळाचे कार्यकर्ते तारखा घेऊ लागले आहेत. यामागे मंडळाला आर्थिक मदत मिळविण्याचाही हेतू आहे.
जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांचे पुत्र संग्रामसिंह पाटील व क्रांतिप्रसाद पाटील राजकारणात येत आहेत. संग्राम पाटील यांची नुकतीच महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनच्या संचालकपदी निवड झाली आहे. या माध्यमातून त्यांनी राजकीय प्रवेश केला असला तरी, तेही गणेशोत्सवात वाळवा जिल्हा परिषद मतदार संघात सर्वांचे आकर्षण ठरतील. दुसरे पुत्र क्रांतिप्रसाद उद्योग क्षेत्रातील यशानंतर राजकारणात डोकावत आहेत.
ज्येष्ठ नेते विलासराव शिंदे यांचे पुत्र वैभव व विशाल शिंदे, आमदार शिवाजीराव नाईक यांचे पुत्र रणधीर, सत्यजित व अभिजित नाईक, नानासाहेब महाडिक यांचे पुत्र राहुल महाडिक, सम्राट महाडिक, सी. बी. पाटील यांचे पुत्र जयराज पाटील, ‘महानंद’चे माजी अध्यक्ष विनायकराव पाटील यांचे पुत्र विशाल पाटील, जगदीश पाटील यांचे पुत्र रणजित पाटील अगोदरच राजकारणात सक्रिय झाले आहेत.
त्यांना आता पुढच्या टप्प्याची ओढ लागली आहे. त्यामुळे तेही गणेशोत्सवात सक्रिय राहण्याची शक्यता आहे.


देणगीसाठी साकडे...
यावर्षी पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांसह व्यापारी वर्गात चिंता आहे. शहरातील बाजारपेठा ओस पडू लागल्या आहेत. त्यामुळे गणेशोत्सवात मंडळांना देणग्या मिळणे मुश्किल होणार आहे. त्यामुळे मंडळांनी नेत्यांच्या वारसदारांना आरतीला बोलावून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत मिळविण्याचा संकल्प केला आहे. बड्या नेत्यांचे राजकीय वारसदारही ही संधी साधून कार्यकर्त्यांशी संवाद साधत जनमानसात आपली छबी उमटविणार, यात शंका नाही. त्यामुळे नेत्यांचे वारसदार, युवा नेते यंदाच्या गणेशोत्सवात गणेश मंडळांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांना, तसेच आरतीला हजेरी लावून शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहेत. गणेश मंडळांचे कार्यकर्तेही त्यांच्याशी जवळीक साधून जास्तीत जास्त देणगी मिळवून गणेशोत्सवाला दरवर्षीपेक्षा भव्य स्वरूप देण्याची तयारी करीत आहेत. एकूणच यंदा गणेशोत्सव दणक्यात साजरा होणार, हे मात्र नक्की.

Web Title: Political heirs to be held

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.