कवठेएकंदमध्ये राजकीय मोर्चेबांधणीला वेग
By Admin | Updated: February 12, 2015 00:37 IST2015-02-11T22:36:18+5:302015-02-12T00:37:15+5:30
सहकारी संस्था निवडणूक : लक्ष मात्र ग्रामपंचायत; इच्छुकांची जोरदार तयारी

कवठेएकंदमध्ये राजकीय मोर्चेबांधणीला वेग
कवठेएकंद : कवठेएकंद (ता. तासगाव) येथे पाणी संस्था, पतसंस्था, सहकारी सोसायट्यांच्या निवडणुकांच्या निमित्ताने राजकीय वर्तुळात मोर्चेबांधणीला वेग आला आहे. त्यातच ग्रामपंचायतीच्या प्रभागवार निवडणुकीतील उमेदवारांचे आरक्षण जाहीर झाल्याने राजकीय वर्तुळात इच्छुकांची तयारी सुरू झाली आहे.
कवठेएकंद येथे सिध्दराज सहकारी शेती पाणी पुरवठा संस्थेच्या निवडणुकांच्या निमित्ताने दोन्ही संस्थांमध्ये सत्ताधारी शेतकरी कामगार पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप महायुतीला खातेही खोलू न देता थोपवले.
पाणी संस्थेच्या निवडणुकीनंतर वसंतदादा विकास सोसायटीसाठीही सत्ताधारी आणि विरोधी गटाकडून अर्ज दाखल केले गेले. मात्र नंतर विरोधकांनी अर्ज काढून घेतल्याने केवळ एका जागेसाठी निंवडणूक होणार आहे. शेकापचे वर्चस्व असलेल्या कवठेएकंद विकास सहकारी सोसायटीचाही निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. येथेही केवळ एकाच जागेसाठी निंवडणूक होईल, अशी शक्यता आहे. क्रांती पतसंस्थेची निवडणूकही बिनविरोध पार पडली आहे. सहकारी संस्थांच्या निवडणुकांमुळे राजकीय कार्यकर्ते रिचार्ज होत आहेत. नुकतेच ग्रामपंचायत निवडणुकीचे प्रभागनिहाय आरक्षण जाहीर झाले आहे. आरक्षणानुसार जातीचे दाखले जुळवाजुळव केली जात आहे. राजकीय पक्षांची नेतेमंडळी सहकारी सोसायटीच्या निवडणुकीनिमित्ताने आगामी ग्रामपंचायतीसाठी फिल्डिंग लावत आहेत.
पुढील ६-७ महिन्यांनंतर ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे. सध्याच्या ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. परंतु दोन सदस्यांनी भाजपकडे कल दिल्याने शेकाप आणि राष्ट्रवादीचा हातात हात घालून राजकीय वर्तुळात वापर सुरु आहे. सध्या शेतकरी कामगार पक्षाकडे सरपंचपद आहे, तर उपसरपंचपद राष्ट्रवादीकडे आहे. (वार्ताहर)
आता भाजपही रिंगणात
सध्याच्या ग्रामपंचायत सदस्यांचा कार्यकाल सहा महिने राहिला आहे. यापूर्वीच्या ग्रामपंचायत निवडणुका शेतकरी कामगार पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये दुरंगी रंगल्या होत्या. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजप महायुतीचे कार्यकर्ते रिचार्ज झाले आहेत. खासदार संजय पाटील यांचा गटही राजकारणात सक्रिय आहे. त्यामुळे येत्या ग्रामपंचायत निवडणुकीत शेकाप, राष्ट्रवादीसह आता भाजपही रिंंगणात उतरणार आहे.