‘त्या’ बुवासह तिघांना पोलीस कोठडी
By Admin | Updated: December 1, 2014 00:13 IST2014-11-30T22:24:55+5:302014-12-01T00:13:45+5:30
भुते काढण्याचा बनाव : प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा

‘त्या’ बुवासह तिघांना पोलीस कोठडी
मिरज : मिरजेत भुते काढण्याचा बनाव करणाऱ्या मंगेश वाघमारे या बुवासह तिघांना न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी दिली. मंगेश वाघमारे या बुवाविरोधात शंकरराव चव्हाण यांनी ‘अंनिस’च्या मदतीने मिरज शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर वाघमारे याच्यासह तिघांविरूध्द जादूटोणा प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिरजेतील बांधकाम व्यावसायिक शंकरराव चव्हाण यांना कौटुंबिक कलह दूर करण्यासाठी बाळू बुचडे या मध्यस्थाने मंगेश वाघमारे या बुवाकडे नेले. या बुवाने भुते काढण्यासाठी प्रत्येक भुतामागे एक हजार रूपये खर्च, असे दोन हजार रूपये घेतले. वाघमारे महाराजाने अस्मिता या आपल्या मुलीचे केस धरून मारहाण करीत भूत काढण्याचा प्रकार केला. या प्रकाराबाबत चव्हाण यांनी अंनिसचे डॉ. प्रदीप पाटील यांच्याशी संपर्क साधून, बुवाबाजीबद्दल पोलिसात फिर्याद दिली. बुवाबाजीप्रकरणी मंगेश वाघमारे, त्याचे साथीदार बाळू बुचडे, सुकुमार ज्ञानू आवळे (रा. मिरज) यांना पोलिसांनी अटक केली. त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली. (वार्ताहर)