CoronaVirus In Sangli : पीएम केअर व्हेन्टिलेटर्स, २० बिनकामाचे आणि बाकीचे चालेचनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 17:35 IST2021-05-13T17:33:29+5:302021-05-13T17:35:55+5:30
CoronaVirus In Sangli : पीएम केअरमधून जिल्ह्याला तब्बल १५२ व्हेन्टिलेटर्स मिळाले खरे, पण त्यातले २० बिनकामाचे, आणि बाकीचे चालेचनात अशी दुर्दैवी स्थिती आहे. आरोग्य यंत्रणेने आपल्या स्तरावर जुगाड करुन ते कार्यान्वित केले, पण अजूनही २० व्हेन्टिलेटर बंद अवस्थेतच आहेत.

CoronaVirus In Sangli : पीएम केअर व्हेन्टिलेटर्स, २० बिनकामाचे आणि बाकीचे चालेचनात
सांगली : पीएम केअरमधून जिल्ह्याला तब्बल १५२ व्हेन्टिलेटर्स मिळाले खरे, पण त्यातले २० बिनकामाचे, आणि बाकीचे चालेचनात अशी दुर्दैवी स्थिती आहे. आरोग्य यंत्रणेने आपल्या स्तरावर जुगाड करुन ते कार्यान्वित केले, पण अजूनही २० व्हेन्टिलेटर बंद अवस्थेतच आहेत.
व्हेन्टिलेटरबाबतीत जिल्ह्याची स्थिती आणिबाणीची आहे. व्हेन्टिलेटर बेड मिळत नसल्याने अनेकांना प्राणास मुकावे लागत आहे. जिल्ह्यात गेल्या जानेवारीपर्यंत ३२५ व्हेन्टिलेटर होते. त्यानंतर विविध स्तरावरुन उपलब्ध होत गेले. गेल्या महिन्यात पीएम केअरमधून एकदम १५२ व्हेन्टिलेटर मिळाले, त्यामुळे आरोग्य यंत्रणेला आनंदाच्या उकळ्या फुटल्या. पण त्यांचे खरे स्वरुप पुढे येताच त्यांच्या आनंदावर विरजण पडले.
सरकारी छापाची उपकरणे कशी भ्रष्टाचाराने पोखरलेली असतात याचे उत्तम उदाहरण म्हणून व्हेन्टिलेटर्सकडे बोट दाखविले गेले. असून अडचण आणि नसून खोळंबा अशी त्यांची अवस्था झाली.
संपूर्णत: इलेक्ट्रॉनिक उपकरण असल्याने त्यांची दुरुस्ती स्थानिक स्तरावर शक्य नव्हती. पण नादुरुस्तीच्या कारणास्तव ती परत पाठविली, तर पुन्हा लवकर मिळण्याची सुतराम शक्यता नव्हती. कोरोनाच्या आणिबाणीच्या काळात काहीही करुन ती वापरात आणणे हा एकमेव पर्याय आरोग्य यंत्रणेपुढे होता. त्यामुळे शासकीय रुग्णालयाच्या बायोमेडिकल अभियंत्यांनी आपले कसब पणाला लाऊन व्हेन्टिलेटर्समध्ये प्राण फुंकले.
सेन्सर बंद, सॉफ्टवेअरही जुळेना
काही व्हेन्टिलेटर्सच्या सेन्सरमध्ये बिघाड होता. अनेक व्हेन्टिलेटर्सच्या सॉफ्टवेअरमध्येही समस्या आहेत. अजूनही त्या सुटलेल्या नाहीत. मिरज कोविड रुग्णालयात २० व्हेन्टिलेटर्स बसवले, त्यापैकी अनेकांना सॉफ्टवेअरची समस्या होती. काहींच्या सेन्सरमध्ये बिघाड होता. काही तास-दोन तासांतच बंद पडायचे. त्यामुळे कर्मचार्यांना डोळ्यांत तेल घालून त्यावर लक्ष ठेवायला लागायचे. रुग्णालयाने तंत्रज्ञाच्या मदतीने ते सुरु केले, त्यानंतरही अद्याप चार बंदच आहेत.
बायोमेडिकल इंजिनीअर कंत्राटी स्वरुपात
रुग्णालयातील इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या तसेच व्हेन्टिलेटर्ससाठी कंपनीकडून वॉरंटी कालावधी आहे. पीएम केअरमधून मिळालेल्या बहुतांशी व्हेन्टिलेटर्समध्ये खुपच मोठ्या संख्येने तांत्रिक बिघाड आहेत. ती सर्वच कंपनीकडे दुरुस्तीसाठी परत पाठविणे गैरसोयीचे होते. त्यामुळे राज्य शासनाने प्रत्येक रुग्णालयाला बायोमेडिकल इंजिनीअर कंत्राटी स्वरुपात नेमण्याचे आदेश दिले. सध्या त्याच्याकडून व्हेन्टिलेटर्स दुरुस्त करुन घेतले जात आहेत.
ग्रामिण भागात रामभरोसे
कवठेमहांकाळ, तासगाव आदी ग्रामिण रुग्णालयांतही व्हेन्टिलेटर्स आहेत, पण सांगली-मिरजेप्रमाणे तेथे तंत्रज्ञ उपलब्ध नाही. बिघाड होतो, तेव्हा कंपनीच्या तंत्रज्ञाची वाट पहावी लागते किंवा सांगली-मिरजेतून तंत्रज्ञ पाठविण्यासाठी मिनतवाऱ्या कराव्या लागतात.
- जिल्ह्यात एकूण मिळाले १५२
- सुरु १३०
- मिरज कोविड रुग्णालयाला मिळाले २०
- सुरु १६
जिल्ह्याला पीएम केअरमधून १५२ व्हेन्टिलेटर्स मिळाले, पैकी अनेकांत बिघाड आहेत. रुग्णालयाच्या स्तरावर बायोमेडिकल अभियंता नियुक्त करुन त्याच्यामार्फत दुरुस्त्या केल्या जात आहेत. व्हेन्टिलेटर्स बंद राहून रुग्णांना प्राणवायूचा तुटवडा होऊ नये याची काळजी घेतली जात आहे. व्हेन्टिलेटर्समध्ये बिघाडांचे प्रमाण जास्त आहे, पण प्रयत्न करुन ते सुरु ठेवले आहेत.
- डॉ. संजय साळुंखे,
जिल्हा शल्यचिकित्सक