दंड, व्याज माफीने साडेनऊ कोटींचा झटका

By Admin | Updated: April 12, 2015 00:47 IST2015-04-12T00:45:49+5:302015-04-12T00:47:14+5:30

एलबीटीची अभय योजना : मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाने महापालिकेची चिंता आणखी वाढली

Penalties, interest amounts to nine crores of rupees | दंड, व्याज माफीने साडेनऊ कोटींचा झटका

दंड, व्याज माफीने साडेनऊ कोटींचा झटका

सांगली : एलबीटी थकबाकीदार व्यापाऱ्यांनी एकरकमी थकबाकी भरल्यास त्यांचा दंड व व्याज माफ करण्याची अभय योजना मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्यामुळे सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेला साडेनऊ कोटींचा झटका बसणार आहे. दंड व व्याजमाफीसाठी कोणतीही मुदत शासनाने न दिल्यामुळे व्यापारी जुलैपर्यंत कर भरण्याचे टाळून शेवटी एकरकमी कर भरण्याची शक्यता आहे.
सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात एलबीटीवरून दोन वर्षे वाद सुरू होता. व्यापाऱ्यांनी असहकार आंदोलन पुकारल्याने महापालिकेची आर्थिक स्थिती डबघाईस आली होती. गेल्याच आठवड्यात व्यापारी व महापालिकेत दिलजमाई झाल्याने एलबीटी वसुलीबाबत महापालिकेला दिलासा मिळाला होता. गेल्यावर्षी एलबीटीतून १४० कोटींचे उत्पन्न अपेक्षित होते. ३० मार्च २०१५ पर्यंत ७३ कोटी रुपयांची वसुली झाली आहे. एक आॅगस्टला एलबीटी रद्द होणार आहे. आणखी चार महिने व्यापाऱ्यांकडून थकित व चालू कराची वसुली केली जाणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभय योजनेच्या माध्यमातून एकरकमी थकबाकी व कर भरणाऱ्या व्यापाऱ्यांचा दंड व व्याज माफ करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. अभय योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणतीही मुदत शासनाने दिलेली नाही. त्यामुळे व्यापारी जुलैपर्यंत पुन्हा थकबाकी ठेवू शकतात. दंड व व्याजाच्या माफीतून महापालिकेला सुमारे साडेनऊ कोटी रुपयांचा फटका बसण्याची शक्यता आहे. याची कोणतीही भरपाई शासन देणार नाही. त्यामुळे दंड व व्याजाच्या कॉलममधील रकमा आता कायमच्या विसराव्या लागणार आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Penalties, interest amounts to nine crores of rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.