पीकविम्यापासून शेतकरी वंचितच!
By Admin | Updated: August 18, 2014 23:34 IST2014-08-18T22:20:32+5:302014-08-18T23:34:12+5:30
जत तालुक्यातील स्थिती : पेरणीचा दाखला मिळेना

पीकविम्यापासून शेतकरी वंचितच!
दरीबडची : महसूल विभागाचे दुर्लक्ष व गावकामगार तलाठी पेरणीचा दाखला देत नसल्याने जत तालुक्यातील शेतकरी राष्ट्रीय पीकविम्यापासून वंचित राहणार आहेत. दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना पीकविम्यामध्ये सहभागी होण्यासाठी १६ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ दिली होती. परंतु १ आॅगस्टनंतर पेरणीचा दाखला मिळत नसल्यामुळे हजारो शेतकऱ्यांना पीकविम्यामध्ये सहभागी होता येत नाही. एका बाजूला दुष्काळाचे संकट, तर दुसऱ्या बाजूला महसूल अधिकाऱ्यांची दफ्तरदिरंगाई, अशा कात्रीत शेतकरी सापडला आहे.
राष्ट्रीय पीक विमा कार्यक्रमांतर्गत हवामानआधारित पीक विमा योजना सुरू आहे. बाजरी, मूग, भुईमूग या पिकांसाठी विम्याची तरतूद केली आहे. बाजरीसाठी २२४ रुपये, मुगासाठी ३०२ रुपये, भुईमुगासाठी ८३३ रुपये प्रति पाच हेक्टरसाठी अशी आहे. अंतिम मुदत ३१ जुलैपर्यंत होती. विमा भरण्याची मुदत कमी दिवसांची होती. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना सहभागी होता आले नव्हते.
शेतकरी, राजकीय नेत्यांनी पीक विम्याला मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. तसेच काही भागामध्ये पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या होत्या. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवडाभरामध्ये पावसाने हजेरी लावल्यामुळे पेरणीला सुरुवात झाली. शासनाने राष्ट्रीय पीक विम्याला १६ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ दिली. परंतु पेरणी १ आॅगस्टनंतर झाली आहे, असा दाखला तलाठी देत नसल्यामुळे पीकविम्यामध्ये शेतकऱ्यांना सहभागी होता येत नाही. शेतकऱ्यांची इच्छा असून सुद्धा पीक विमा भरता येत नाही. त्यामुळे पीक विमा योजनेकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली आहे.तालुक्यातील महसूल विभागाकडून सात-बारा खातेउताऱ्याचे संगणकीकरणाचे काम अनेक महिन्यांपासून सुरू आहे. प्रत्येक सजातील दफ्तर संगणकीकृत करण्यासाठी घेण्यात आले आहे. त्यामुळे तलाठी गावातच येत नाहीत. गावातील कारभार कोतवाल, झिरो तलाठी यांच्या साहाय्याने सुरू आहे. शेतकऱ्यांना सात-बारा खातेउतारा मिळविण्यासाठी अनेक दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे. जादा पैसे वसूल करून शेतकऱ्यांची लुबाडणूक केली जात आहे. सात-बारा उताऱ्यावर सही आणण्यासाठी जतला जावे लागत आहे.योजनेस मुदतवाढ मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी सात-बारा खातेउतारा मिळविला आहे. परंतु गावकामगार तलाठ्याकडून १ आॅगस्टनंतर पेरणी झाल्याचा दाखला न दिल्यामुळे योजनेमध्ये सहभागी होता येत नाही. पावसाअभावी खोळंबलेल्या पेरण्या आॅगस्टमध्ये सुरू आहेत. (वार्ताहर)
पीक विमा भरण्यासाठी सर्व कागदपत्रे तयार करून ठेवली होती. तलाठ्याकडून पेरणीचा दाखला न मिळाल्यामुळे पीक विमा भरता आलेला नाही. पीकविम्यापासून वंचित रहावे लागणार आहे.
- भीमराव माने, वंचित शेतकरी
शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या...
वास्तविक तलाठ्याकडून प्लॉटची पाहणी करणे आवश्यक आहे. जतमध्ये संगणकीकरणाचे काम सुरू असल्याने ते सजात येत नाहीत. त्यामुळे सजातील पीकपाण्याची माहिती मिळत नाही. प्रतिकूल वातावरणीय, कायम दुष्काळी तालुक्याचा शाप लाभलेल्या जतमधील शेतकऱ्यांना शासकीय यंत्रणेच्या दफ्तरदिरंगाईचाही शाप लाभत आहे. त्यामुळे दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या अडचणी वाढत आहेत.