शिकलगारांच्या निर्णयावर पाटलांचे भवितव्य

By Admin | Updated: August 24, 2015 23:39 IST2015-08-24T23:38:18+5:302015-08-24T23:39:35+5:30

स्थायी सभापती निवड : मदनभाऊंच्या निर्णयाकडे लक्ष; सप्टेंबरमध्ये कार्यक्रम

Patels' future | शिकलगारांच्या निर्णयावर पाटलांचे भवितव्य

शिकलगारांच्या निर्णयावर पाटलांचे भवितव्य

सांगली : महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी काँग्रेसच्या नगरसेवकांनी आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. समितीतील ज्येष्ठ सदस्य हारूण शिकलगार यांचे नाव सध्या आघाडीवर असले तरी, त्यांनी सभापतीपद नाकारल्यास सांगलीवाडीचे दिलीप पाटील व संतोष पाटील यांच्यापैकी एकाची वर्णी लागू शकते. सभापतीपद मदनभाऊनिष्ठ नगरसेवकालाच मिळणार, हे स्पष्ट असून ते कोणाला संधी देतात, याची उत्सुकता लागली आहे.
महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीची निवड सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. नुकतीच समितीच्या आठ सदस्यांची महासभेत निवड करण्यात आली. त्यात काँग्रेसच्या सहा, तर राष्ट्रवादीच्या दोघांचा समावेश आहे. काँग्रेसमध्ये स्थायी सदस्यपदासाठी रस्सीखेच होती. काँग्रेसअंतर्गत मदन पाटील व पतंगराव कदम गटात संघर्ष पेटला होता. या संघर्षात मदन पाटील यांनी बाजी मारत आपल्याच निष्ठावंतांची सदस्यपदी वर्णी लावली. सहापैकी एक जागा पतंगराव समर्थक धोंडुबाई कलकुटगी यांना देण्यात आली.
स्थायी समितीत काँग्रेसचे नऊ सदस्य आहेत. त्यापैकी आठ सदस्य मदन पाटील यांचा शब्द मानणारे आहेत. त्यामुळे या आठ सदस्यांपैकीच एकाला सभापतीपद मिळणार, हे स्पष्ट आहे. सध्या समितीतील ज्येष्ठ सदस्य हारूण शिकलगार यांचे नाव सर्वात आघाडीवर आहे. पण शिकलगार यांनी यापूर्वी दोनदा स्थायीचे सभापतीपद भूषविले आहे. आता ते महापौर पदासाठी इच्छुक आहेत. मदन पाटील यांनी शिकलगार यांना महापौर पदाचा शब्द दिल्यास ते सभापती पदापासून दूर होऊ शकतात. महापौर पदाबाबत अडचण असेल, तर सभापतीपद मिळावे, असा आग्रह शिकलगार यांनी धरल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे त्यांच्याबाबत मदन पाटील काय निर्णय घेतात, यावरच सभापती पदाचे भवितव्य अवलंबून आहे.
शिकलगार यांच्यासह सांगलीवाडीचे दिलीप पाटील, संतोष पाटील यांनीही सभापती पदावर दावा सांगितला आहे. संतोष पाटील हे मदनभाऊंच्या प्रभागातून निवडून आले आहेत, तर दिलीप पाटील यांनी कधी नव्हे ते सांगलीवाडीचा गड सर करून मदनभाऊंची पताका फडकविली आहे. त्यामुळे या दोन पाटलांच्या नावांचा प्रामुख्याने विचार होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे इच्छुकांनी आतापासून मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Patels' future

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.