पलूस तालुक्यात केवळ ४९ टक्के पाऊस
By Admin | Updated: August 20, 2015 22:47 IST2015-08-20T22:47:45+5:302015-08-20T22:47:45+5:30
शेतकरी धास्तावला : पशुधन जगविण्याचे आव्हान; २५ हजार हेक्टरचे नुकसान

पलूस तालुक्यात केवळ ४९ टक्के पाऊस
आर. एन. बुरांडे -पलूससधनतेमुळे नेहमी निश्चिंत असणारा पलूस तालुक्यातील शेतकरी यावर्षी मात्र आजअखेर केवळ ४९.५ टक्के पडलेल्या पावसाने धास्तावला आहे. सिंचनाखालील २४६९४.०० हेक्टर क्षेत्रातील शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून, पशुधन जगविण्याचा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा आहे. एकूण ३५ गावांचा पलूस तालुका सांगली जिल्ह्यातील एक सधन आणि लहान तालुका म्हणून ओळखला जातो. कृष्णा आणि वेरळा नद्यांनी तालुका वेढलेला असूनही, यंदा पावसाने ओढ दिल्याने कृष्णेचे पाणी कमी झाले आहे. येरळा नदी तर कोरडीच पडली आहे. तालुक्यात ३७ उपसा जलसिंचन योजनांचे जाळे असूनही पाण्याअभावी त्या बंद ठेवाव्या लागत आहेत. पर्यायाने भूजल पातळी खालावली आहे. परिसरातील विहिरी, तलाव, कूपनलिका, ओढे, नाले कोरडे ठणठणीत आहेत. वाढत्या उन्हाच्या तीव्रतेने उर्वरित पाणीसाठा वेगाने कमी होत आहे. नेहमी हिरवागार असणारा पलूस तालुका हळूहळू पिवळा पडू लागला आहे. अपुऱ्या पावसाने खरीप हंगाम आता जवळपास काळवंडलेला आहे. यामुळे आताच्या या भीषण परिस्थितीला कसे तोंड द्यायचे, याची चिंता शेतकरी आणि सर्वसामान्यांना लागली आहे.तालुक्याचे एकूण क्षेत्र २७ हजार ४४५ हेक्टर आहे. शेतीतील बागायती क्षेत्र ८ हजार ११३ हेक्टर आहे. खरिपाचे क्षेत्र २३ हजार १६५ हेक्टर आहे. रब्बीचे क्षेत्र ३ हजार १८६ हेक्टर आहे, तर क्षारपड क्षेत्र एक हजार ६८२ हेक्टर आहे. बागायती क्षेत्रामध्ये भिलवडी, अंकलखोप, आमणापूर, नागराळे, बुर्ली, पलूस, पुणदी, घोगाव, धनगाव, दह्यारी, तुपारी, ब्रह्मनाळ, वसगडे आदी गावांचा समावेश आहे. या गावातील क्षेत्र ऊस आणि द्राक्षशेतीखाली येते. सोयाबीनचे क्षेत्र सुद्धा मोठे आहे. येथील पशुधन सुद्धा मोठे आहे. या पशुधनाला ओला हिरवा चारा खाण्याची सवय आहे. परंतु क्षेत्रात आता उभे पीक नाही आणि गवतही नाही. त्यामुळे जनावरांचे प्रचंड हाल होत आहेत. पावसाने ओढ दिल्यास जनावरांना खायला काय द्यायचे? हा प्रश्न आतापासूनच शेतकऱ्यांना सतावू लागला आहे. शिवाय हंगाम वायाच जाणार असल्याने विकत चारा घेऊन जनावरांना सांभाळणेही जिकिरीचे होणार आहे.कृष्णाकाठच्या गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर नाही. परंतु पावसाने ओढ दिल्यास मोराळे, आंधळी परिसरातील गावात यापुढील काळात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे.पावसाने ओढ दिल्याने सध्या बाजारपेठेत मंदीचे सावट आहे. परिसरातील किराणा, कृषी सेवा केंद्रे तसेच कापड दुकानदार आणि बॅँकिंग व्यवसायावर परिणाम झाल्याचे चित्र आहे.
कृष्णा कालवा बारमाही करा
जिल्ह्यातील सर्वात सधन तालुका म्हणून पलूस तालुक्याची ओळख होती. पण पावसाने ओढ दिल्याने यंदा येथील सधन शेतकरीही अडचणीत सापडले आहेत. खरीप हंगाम वाया गेल्यात जमा आहे. शेतीला जोडधंदा म्हणून शेतकऱ्यांनी पशुपालन केले आहे. परिसरात दूध संस्थाही मोठ्या आहेत. पण हंगाम वाया गेल्याने यापुढे वर्षभर जनावरे सांभाळायची कशी? हे सर्वात मोठे आव्हान शेकऱ्यांसमोर आहे. तालुक्यातून कृष्णा-कालवा जातो. हा कालवा बारमाही व्हावा, अशी येथील शेतकऱ्यांची मागणी आहे. हा कालवा बारमाही झाला तर दुधोंडी, बुर्ली, आमणापूर, पलूस यासह अनेक लहान गावांना फायदा होणार आहे. पशूधन वाचविणेही शक्य होणार आहे. तालुक्यातून वाहणारी येरळा नदी कोरडी आहे. आरफळ योजनेचे पाणी वेळोवेळी येरळेत सोडले तर, मोराळे, आंधळी, बांबवडे हा भाग सुपीक होणार आहे. या साऱ्या बाबी व शक्यता लक्षात घेऊन पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांमधून होत आहे.